Galgotias University Row: ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास युनिव्हर्सिटी सध्या एका विचित्र कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटमध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा शोध असल्याचे सांगून प्रदर्शित केल्याचा आरोप युनिव्हर्सिटीवर झाला आहे.
या प्रकारानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यावर आता विद्यापीठाने अधिकृत माफीनामा जाहीर केला आहे.
नेमका वाद काय?
एआय समिटमध्ये गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या स्टॉलवर एक रोबोटिक डॉग दाखवण्यात आला होता. युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधी नेहा सिंग यांनी कॅमेऱ्यासमोर हा रोबोट त्यांच्या टीमने बनवल्याचा दावा केला होता आणि त्याला ‘ओरियन’ असे नाव दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हा रोबोट चीनमधील युनिट्री या कंपनीचा असून त्याची किंमत साधारण 2,800 डॉलर (सुमारे 2.3 लाख रुपये) आहे. हा रोबोट ऑनलाइन सहज उपलब्ध असून युनिव्हर्सिटीने केवळ तो विकत घेऊन स्वतःचा असल्याचे भासवल्याचा आरोप युजर्सनी केला.
युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण आणि माफी
वाद वाढल्यानंतर युनिव्हर्सिटीने २ दिवसात ३ वेळा स्पष्टीकरण दिले.
- प्रतिनिधीवर खापर: युनिव्हर्सिटीने कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख नेहा सिंग यांना दोष दिला आहे. त्या अधिकृत प्रवक्त्या नव्हत्या आणि कॅमेऱ्यासमोर उत्साहाच्या भरात त्यांनी चुकीची माहिती दिली, असा दावा युनिव्हर्सिटीने केला आहे.
- केवळ शिकण्यासाठी वापर: हा रोबोट आम्ही बनवलेला नाही आणि तसा दावाही आमचा नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि प्रयोगासाठी तो विकत घेतला होता, असे आता युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
- समिटमधून एक्झिट: वाद वाढल्यानंतर आयोजकांच्या सूचनेनुसार युनिव्हर्सिटीने समिटमधील आपला स्टॉल रिकामी केला आहे.
सरकारची कडक भूमिका
आयटी सचिव एस कृष्णन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एआय समिटमध्ये कोणत्याही प्रदर्शकाला दुसऱ्याची उत्पादने स्वतःची म्हणून दाखवण्याची परवानगी नाही, असे सरकारने स्पष्ट केले. “आम्हाला अशा कोणत्याही प्रदर्शनांची गरज नाही जे मूळ नाहीत,” अशा शब्दांत सरकारने गलगोटियास युनिव्हर्सिटीला फटकारले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून शैक्षणिक संस्थांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.














