DGCA New Rules: हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भारताचे विमानन नियामक डीजीसीएने ‘झीरो टॉलरेंस पॉलिसी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान, क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे कडक नियम बनवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
त्रास देणाऱ्या प्रवाशांचे ४ स्तर
डीजीसीएने प्रवाशांच्या शिस्तहीन वागणुकीचे वर्गीकरण ४ स्तरांमध्ये केले आहे, त्यानुसार कारवाईची तीव्रता ठरेल:
- लेवल 1: असभ्य हातवारे करणे, शिवीगाळ करणे किंवा नशेत धिंगाणा घालणे.
- लेवल 2: धक्काबुक्की करणे, मारहाण करणे, अयोग्य स्पर्श किंवा लैंगिक छळ करणे.
- लेवल 3: विमानाचे नुकसान करणे, गळा दाबणे किंवा कोणावर जीवघेणा हल्ला करणे.
- लेवल 4: वैमानिकाच्या केबिनमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणे.
या नियमांनुसार, गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित प्रवाशावर आजीवन बंदी घालण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.
एअरलाइन्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
डीजीसीए प्रमुख फैज अहमद किदवई यांनी प्रस्तावित केलेल्या मसुद्यानुसार, प्रत्येक एअरलाइनला आता एक स्पष्ट कार्यपद्धती (SOP) तयार करावी लागेल. विमानतळावरील चेक-इन काउंटर, बोर्डिंग गेट किंवा विमानामध्ये गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाची माहिती त्वरित सुरक्षा यंत्रणांना देणे बंधनकारक असेल. अशा प्रवाशांना विमानात चढण्यापासून रोखण्याचे अधिकार एअरलाइन्सना देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी कडक पावले
गृह मंत्रालयाकडून ज्या व्यक्तींना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानले जाईल, अशांची नावे थेट ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकली जातील. अशा व्यक्तींच्या नावांची यादी सार्वजनिक केली जाणार नाही आणि त्यांच्यावर प्रवासासाठी कायमस्वरूपी बंदी असेल. अशा प्रकरणांमध्ये अपील करण्याची तरतूदही ठेवण्यात आलेली नाही.
डीजीसीएने हे देखील स्पष्ट केले आहे की, एअरलाइन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी उद्धटपणे वागू नये. प्रवाशांच्या रास्त तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे देखील अनेकदा वाद होतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही संयमाने वागण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.














