Rohit Pawar and Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागावी, यासाठी हालचाली सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाला पक्षातील सर्वच आमदारांचा पाठिंबा नसल्याचे संकेत देत रोहित पवारांनी या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे.
अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सर्वांच्या सह्या नाहीत?
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी खळबळजनक माहिती दिली. “सुनेत्रा काकींनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे, यासाठी सर्वच आमदारांनी सहमती दर्शवलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दाव्यानुसार, एकूण आमदारांपैकी केवळ ३५ आमदारांनीच या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उर्वरित आमदार आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सह्या का केल्या नाहीत, हा आता संशोधनाचा विषय असल्याचे रोहित पवार म्हणाले. ज्यांनी समर्थन दिले नाही, ते नेमके कोण आहेत आणि त्यांच्या मनात काय चालले आहे, यावरून पक्षात गटबाजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर संशयाची सुई?
येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत निवड होणार असल्याचे संकेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले होते. मात्र, तत्पूर्वीच रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे पक्षातील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप काही स्तरांतून होत असतानाच, रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न या संशयाला बळ देणारे ठरत आहेत.
अजित पवारांची ‘ती’ शेवटची इच्छा आणि विलीनीकरणाची चर्चा
यावेळी रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही भाष्य केले. अजित पवार हयात असताना त्यांना दोन्ही पक्ष आणि कुटुंब पुन्हा एकत्र यावे, अशी तीव्र भावनिक इच्छा होती, असा दावा रोहित यांनी केला. “अजित दादांना राजकारणापेक्षा कुटुंबाची ओढ जास्त होती. त्यांना पक्षसंघटनेत मोठे बदल घडवायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक नेतृत्वाची नियुक्ती व्हावी, असा त्यांचा मानस होता. त्यासाठीच अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये अमोल कोल्हे यांची उपस्थिती असायची,” असे रोहित पवारांनी आवर्जून सांगितले.
राजकीय भविष्याची अनिश्चितता
अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था आहे. २६ फेब्रुवारीच्या निवडीपूर्वी रोहित पवारांनी केलेल्या या ‘गौप्यस्फोटामुळे’ पक्षांतर्गत वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.














