Maharashtra SSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची (SSC) मुख्य परीक्षा उद्या, २० फेब्रुवारी पासून राज्यभरात सुरू होत आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या शैक्षणिक महाकुंभासाठी शिक्षण मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
राज्यातील विद्यार्थी संख्या आणि केंद्रांची व्याप्ती-
यंदा संपूर्ण राज्यातून एकूण १६,११,६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ८,६४,४८० मुले, ७,४७,१३६ मुली आणि १२ पारलिंगी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील २३,६८३ शाळांमधील हे विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी एकूण ४,९९९ मुख्य परीक्षा केंद्रांची (आणि नाशिक-पुणे विभागातील उपकेंद्रे मिळून ५,१११ केंद्रांची) व्यवस्था करण्यात आली आहे.
विभागनिहार परीक्षेची सज्जता-
राज्यातील प्रमुख विभागांमधील परीक्षार्थींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
१. मुंबई विभाग: सर्वाधिक ३.४८ लाख विद्यार्थी मुंबई विभागातून परीक्षा देतील. यात १.८१ लाख मुले आणि १.६६ लाख मुलींचा समावेश आहे. एक केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले असून, २१ भरारी पथके तैनात आहेत.
२. पुणे विभाग: या विभागातून २ लाख ७८ हजार १४५ विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत.
३. नाशिक विभाग: नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतून २ लाख ६ हजार ६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४९३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल.
४. नागपूर विभाग: १ लाख ५३ हजार ७३९ विद्यार्थी ६८३ केंद्रांवर परीक्षा देतील. गडचिरोली आणि गोंदिया सारख्या दुर्गम भागांतही केंद्रांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
५. ‘कॉपीमुक्त’ अभियानासाठी कडक निर्बंध
परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने ‘कॉपीमुक्त’ अभियान हाती घेतले आहे.
६. प्रतिबंधात्मक क्षेत्र: प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ४०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार निर्बंध लादण्यात आले असून, या क्षेत्रातील सर्व झेरॉक्स दुकाने परीक्षा काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
७. सीसीटीव्ही आणि पथके: बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख असून, राज्यभर भरारी आणि बैठी पथके संशयित हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सवलती आणि सूचना
विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत:
१. अतिरिक्त वेळ: यंदा प्रत्येक पेपरसाठी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.
२. उपस्थिती: विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
३. दिव्यांग सवलती: दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार लेखनिक आणि जास्तीचा वेळ अशा विशेष सवलती पुरवण्यात येणार आहेत.
४. प्रवेशपत्र: हॉल तिकीट हरवल्यास किंवा तांत्रिक अडचण असल्यास शाळांच्या लॉगईनमधून ते उपलब्ध करून घेण्याची सोय करण्यात आली आहे.














