Bank Locker Rules : दिल्लीतील एका पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. एका महिला ग्राहकाने आणि केच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे इतर लॉकर धारकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून, बँकेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
बँकेत नेमका काय घडला प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलांनी आपले लॉकर बँकेच्या अधिकृत प्रक्रियेनुसार उघडले होते. मात्र, लॉकर उघडल्यानंतर त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात लॉकरचे कुलूप तोडल्याचे किंवा कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे, हे लॉकर ५ फेब्रुवारी रोजीच शेवटचे हाताळण्यात आले होते.
बँक लॉकर चोरीला गेल्यास भरपाई किती मिळते?
अनेक ग्राहकांना वाटते की लॉकरमधील सामानाची पूर्ण जबाबदारी बँकेची असते, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम काहीसे वेगळे आहेत:
- बँकेची जबाबदारी: बँक केवळ लॉकरसाठी सुरक्षित जागा आणि मूलभूत सुरक्षा पुरवते. लॉकरमध्ये काय ठेवले आहे, याची माहिती बँकेला नसते.
- नुकसान भरपाईची मर्यादा: जर बँकेच्या निष्काळजीपणामुळे (उदा. सीसीटीव्ही बंद असणे किंवा कर्मचाऱ्याची चूक) चोरी झाली, तरच बँक जबाबदार असते. आरबीआयच्या 2022 च्या नियमांनुसार, अशा परिस्थितीत बँक जास्तीत जास्त लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट इतकीच भरपाई देऊ शकते.
- उदाहरण: जर तुमच्या लॉकरचे वार्षिक भाडे 4,000 रुपये असेल, तर चोरी झाल्यास बँक जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंतच भरपाई देईल, मग तुमच्या दागिन्यांची किंमत कितीही जास्त असली तरीही.
- अपवाद: भूकंप किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेल्या नुकसानीसाठी बँक जबाबदार नसते.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, केवळ बँक लॉकरवर अवलंबून न राहता मौल्यवान वस्तूंचा स्वतंत्र विमा उतरवणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ग्राहकांनी लॉकर घेताना करारातील अटी काळजीपूर्वक वाचाव्यात आणि दागिन्यांचे फोटो, बिले आणि इतर रेकॉर्ड नेहमी जपून ठेवावेत.















