Devendra Fadnavis and Ajit Pawar : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण सभागृह एका अत्यंत जड आणि शोकाकुल वातावरणात बुडाले होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. “अजितदादा म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते अनेकांचा आत्मविश्वास होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
‘शब्दाला जागणारा खंबीर नेता’-
अजित पवार यांच्या शिस्तीचा आणि कार्यपद्धतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, दादांचे अस्तित्व सभागृहात आणि प्रशासनात कायम ठळकपणे जाणवायचे. “सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा लोकनेता अशी त्यांची ख्याती होती. ‘कार्यमग्नता ख्याती व्हावी, मृत्यू हीच विश्रांती’ हे वचन त्यांना तंतोतंत लागू पडते. ते आपल्या शब्दाला जागणारे नेते होते, याचा अनुभव मी २०१९ मध्ये घेतला आहे. त्यावेळी त्यांच्या वरिष्ठांनी शब्द बदलला असला, तरी दादांनी दिलेला शब्द पाळला होता,” असे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
जन्मदिनाचे आणि अंतःकरणाचे नाते-
मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यातील वैयक्तिक जिव्हाळ्यावर प्रकाश टाकताना फडणवीस म्हणाले, “आमचा दोघांचाही जन्म २२ जुलै रोजी झाला आहे. दादा माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. २०१४ नंतर आमच्यात एक वेगळे भावनिक नाते निर्माण झाले होते. राजकारणात आम्ही एकमेकांचे ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ असलो, तरी आमचे अंतःकरणापासूनचे नाते होते आणि त्यांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते, हे मला ठाऊक होते.”
शेवटची भेट आणि तो दुर्दैवी अपघात-
अजितदादांसोबतच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. २७ जानेवारी २०२६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर पायाभूत सुविधांच्या बैठकीत दादा नेहमीप्रमाणेच सक्रिय होते. त्यांनी अधिकाऱ्यांना भांडवली खर्चातील ‘ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन’बाबत त्यांच्या खास शैलीत जाब विचारला होता. “बैठकीनंतर आम्ही मंत्रालयातील माझ्या दालनात सुमारे ३० ते ४० मिनिटे विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ती आमची शेवटची भेट ठरेल, याची पुसटशी कल्पनाही तेव्हा नव्हती. दुसऱ्या दिवशी अपघाताची बातमी आली, तेव्हा प्रारंभी वाटले की दादा सुखरूप असतील; परंतु विमानाची भीषण अवस्था पाहिल्यावर सत्य परिस्थिती लक्षात आली,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मातीशी जोडलेले नेतृत्व
अजित पवार हे संघर्षाला कधीही पाठ न दाखवणारे आणि मातीशी नाळ जोडलेले नेतृत्व होते. सार्वजनिक जीवनात वावरताना जर एखादी चूक झाली आणि ती समाजाला पटली नाही, तर ती मान्य करून जाहीर माफी मागण्याचे मोठेपण त्यांच्याकडे होते, असेही फडणवीस म्हणाले. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व शांत झाले असून, ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.











