AI Summit 2026 : नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ (AI Impact Summit 2026) मध्ये नोएडा येथील प्रसिद्ध गलगोटिया विद्यापीठाला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. विद्यापीठाने प्रदर्शनात सादर केलेल्या एका रोबोटिक श्वानावरून (रोबोडॉग) मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणामुळे विद्यापीठावर समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या घटनेला इंटरनेटवर ‘नॅशनल एम्बॅरसमेंट’ म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील नामुष्की म्हणून संबोधले जात आहे.
नेमका वाद काय?
गलगोटिया विद्यापीठाने या परिषदेत एका रोबोटिक श्वानाचे प्रदर्शन केले होते. यावेळी विद्यापीठाने असा दावा केला होता की, हा रोबोडॉग त्यांच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आला आहे. याला ‘ओरियन’ (Orion) असे नावही देण्यात आले होते. विद्यापीठाच्या या दाव्यामुळे सुरुवातीला सर्वांचे लक्ष वेधले गेले; मात्र तांत्रिक क्षेत्रातील जाणकारांनी याची सूक्ष्म पाहणी करताच सत्य समोर आले.
चिनी बनावटीच्या मॉडेलशी साधर्म्य
विद्यापीठाचा ‘इन-हाउस’ संशोधनाचा दावा समाजमाध्यमांवरील सतर्क वापरकर्त्यांनी क्षणार्धात खोडून काढला. नेटिझन्सनी हे निदर्शनास आणून दिले की, प्रदर्शनात मांडलेला हा रोबोडॉग प्रत्यक्षात चीनमधील ‘युनिट्री’ (Unitree) या कंपनीचे व्यावसायिक मॉडेल आहे, जे बाजारात सहज उपलब्ध आहे. स्वतःच्या संशोधनाचा शिक्का मारून परदेशी बनावटीचे तंत्रज्ञान सादर केल्यामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मीम्स आणि उपहासाचा महापूर
हा ‘रोबोडॉग’ घोटाळा उघडकीस आल्यानंतर समाजमाध्यमांवर गलगोटिया विद्यापीठाची मोठी खिल्ली उडवली जात आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर गमतीशीर मीम्स आणि जोक्सचा पूर आला आहे. शिक्षण क्षेत्रातील एका प्रतिष्ठित संस्थेने अशा प्रकारे दुसऱ्याच्या उत्पादनावर स्वतःचा हक्क सांगणे, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
गलगोटिया विद्यापीठाचा ‘रोबोडॉग’ वाद निवळण्याऐवजी चिघळला; भारत मंडपममधील स्टॉल हटवण्याचे आदेश, व्यवस्थापनाकडून जाहीर माफी
खोट्या दाव्यांमुळे झालेल्या टीकेनंतर आता केंद्र सरकारने या प्रकरणी कठोर पावले उचलली असून, विद्यापीठाला या महोत्सवातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून समाजमाध्यमांवर विद्यापीठाची मोठी नाचक्की होत आहे.
नेटिझन्सचा उपहास आणि तांत्रिक प्रश्न
हा वाद समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांनी गलगोटिया विद्यापीठावर मिश्किल टिप्पणी सुरू केली आहे. एका वापरकर्त्याने “द लाईफ ऑफ गलगोटिया: दिग्दर्शक आणि निर्माते गलगोटिया विद्यापीठ” असे कॅप्शन देऊन विद्यापीठाची थट्टा केली. केवळ मीम्सच नव्हे, तर या प्रदर्शनाच्या तांत्रिक गांभीर्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “एखादा रिमोट कंट्रोलवर चालणारा किंवा आधीच प्रोग्राम केलेला रोबोट केवळ हालचाल करतो म्हणून त्याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणता येईल का? प्रगत एआय समिटमध्ये अशा उपकरणाचे काय काम?” असा सवाल एका संतप्त नेटिझनने विचारला आहे.
विद्यापीठ प्रशासनाची सारवासारव-
वाढता रोष पाहून विद्यापीठाचे कुलसचिव नितीन कुमार गौर यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. हा रोबोडॉग विद्यापीठाने शोधल्याचा दावा कधीही अधिकृतरीत्या केला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्या प्राध्यापिका नेहा सिंह यांच्या विधानामुळे हा वाद उद्भवला होता, त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “कदाचित उत्साहाच्या भरात आणि घाईगडबडीत माझ्याकडून गोष्टी नीट मांडल्या गेल्या नाहीत. संवाद साधताना झालेल्या चुकीमुळे माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला असावा.” त्यांनी या गोंधळाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली असली तरी, तोपर्यंत विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली होती.
सरकारची मोठी कारवाई आणि विद्यापीठाची माफी-
या प्रकरणाचे पडसाद प्रशासकीय स्तरावरही उमटले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या वादाची गंभीर दखल घेत, गलगोटिया विद्यापीठाला भारत मंडपममधील आपला स्टॉल तातडीने रिकामा करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून या “गोंधळा”बद्दल माफी मागितली असल्याचे समोर येत आहे.











