Home / महाराष्ट्र / Jayant Patil Speech on Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची नजर लागली?-अजितदादांच्या निधनाने जयंत पाटील हेलावले, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Jayant Patil Speech on Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची नजर लागली?-अजितदादांच्या निधनाने जयंत पाटील हेलावले, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Jayant Patil Speech on Ajit Pawar : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्तावादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे...

By: Team Navakal
Jayant Patil Speech on Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Jayant Patil Speech on Ajit Pawar : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्तावादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. २८ जानेवारीच्या त्या काळरात्रीने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व हिरावून नेल्याची खंत व्यक्त करताना जयंत पाटील यांचे शब्द जड झाले होते. “महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची नजर लागली माहीत नाही, पण नियतीने एका कणखर नेत्याला आपल्यातून ओढून नेले,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

नियतीचा क्रूर घाला आणि ‘दिग्गजांची’ आठवण-
आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी नियतीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र ज्यांच्याकडे मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहतो, अशाच नेत्यांना हिरावून घेण्याची नियतीची जणू पद्धतच झाली आहे का? विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि आता अजित दादा… एकामागून एक दिग्गज नेते अकाली निघून गेले. गेल्या दोन दशकांपासून दादा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल, तेव्हा अजितदादांच्या नावाशिवाय तो पूर्ण होऊच शकणार नाही.”

स्पष्टवक्तेपणा आणि आर. आर. आबांचा किस्सा-
अजित पवारांच्या स्वभावातील ‘खरेपणा’ ठळक करताना जयंत पाटील यांनी एक जुना किस्सा सांगितला. “दादांचा स्वभाव अतिशय स्पष्ट होता; जे मनात असायचे तेच त्यांच्या ओठावर असायचे. एका जाहीर सभेत त्यांनी आर. आर. आबांना त्यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवरून जाहीरपणे सुनावले होते. ते बोलणे कदाचित आबांना रुचले नसेल, म्हणून मी स्वतः आबांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली होती. पण त्याच वेळी मी आबांना हेही सांगितले होते की, दादा जे बोलले ते त्यांच्या आरोग्यासाठी योग्यच होते. समोरच्याचे चुकले असेल तर ते त्याच्या तोंडावर सांगण्याची हिंमत केवळ दादांकडेच होती.”

प्रशासकीय समज आणि बारामतीची शिस्त-
जयंत पाटील यांनी अजितदादांच्या कामाच्या शिस्तीचे कौतुक करताना सांगितले की, दादांना प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा हवा असायचा. “एकदा ते माझ्या संस्थेत आले असता त्यांनी झाडांच्या कमतरतेवरून मला सुनावले आणि बारामतीला येऊन वृक्षारोपण कसे असावे हे पाहण्यास सांगितले. त्यांची राजकीय समज अफाट होती. संघर्ष यात्रेच्या काळात विखे-पाटील यांनी केलेली व्यवस्था पाहून, ‘अशा कर्तबगार माणसाला आपल्या पक्षात खेचले पाहिजे,’ असे सांगणारी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. जर आज दादा आपल्यात असते, तर ते निश्चितच राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले असते,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

पवार साहेबांवरील अढळ प्रेम-
अजित पवारांच्या मनातील शरद पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, “दादांच्या बोलण्यातून त्यांचे साहेबांवरील प्रेम नेहमीच झळकायचे. ‘तू असशील मोठ्या बापाचा, पण मी पण मोठ्या काकांचा मुलगा आहे,’ हे त्यांचे विधान त्यांच्यातील स्वाभिमान आणि काकांवरील निष्ठा दर्शवणारे होते. मधल्या काळात आमच्या अनेक बैठका झाल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि आनंद असायचा.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या