Beed News : आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका भीषण आगीच्या घटनेत दोन शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असले तरी, एका पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्यांच्या घरावरुन ११ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणगी पडली आणि घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील पाळीव कुत्र्याने मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याच्या सततच्या भुंकण्यामुळे शेतकरी दांपत्याला जाग आली आणि त्यांनी वेळीच घराबाहेर धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू जळून भस्मसात झाल्या होत्या. डोळ्यांदेखत संसाराची राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.











