Home / देश-विदेश / Cockroach Janata Party : सर्वोच्च पदांवर बसलेल्यांना फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी! CJP’ चे प्रवक्ते सौरव दास यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ओढले ताशेरे!

Cockroach Janata Party : सर्वोच्च पदांवर बसलेल्यांना फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी! CJP’ चे प्रवक्ते सौरव दास यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ओढले ताशेरे!

Cockroach Janata Party : देशातील बेरोजगार तरुणांविषयी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्याचे समाजमाध्यमांवरील पडसाद हे जगासमोर आहेतच....

By: Team Navakal
Cockroach Janata Party
Social + WhatsApp CTA

Cockroach Janata Party : देशातील बेरोजगार तरुणांविषयी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्याचे समाजमाध्यमांवरील पडसाद हे जगासमोर आहेतच. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले होते, “काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, जे पुढे जाऊन प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया किंवा माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते बनतात आणि संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून हल्ला करू लागतात.” सरन्यायाधीशांच्या या वादग्रस्त विधानानंतर तरुणांच्या हक्कांसाठी आणि या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाच्या एका अनोख्या सोशल मीडिया मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

या डिजिटल मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या अमेरिकेत असून, त्यांनी या अन्यायाविरुद्ध थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, दीपके आगामी ६ जून रोजी भारतात परतणार असून नवी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर येथे एका शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. या मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यासाठी नुकतीच ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली ज्यात, सौरव दास, विजेता दहिया आणि आशुतोष रांका या तिघांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रवक्ते सौरव दास यांची मुलाखत व्हायरल; सरन्यायाधीशांच्या विधानाचा आणि पेपरफुटीचा तीव्र निषेध-
‘कॉक्रोच जनता पार्टी’ या सोशल मीडिया मोहिमेचे नवनियुक्त तिन्ही प्रवक्ते सध्या विविध प्रसारमाध्यमांना सातत्याने मुलाखती देत असून, त्यापैकी मुख्य प्रवक्ते सौरव दास यांची एक मुलाखत समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान संबंधित निवेदिकेने थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ हा शब्द प्रामुख्याने सौरव दास यांच्यासाठीच वापरला; कारण दास यांची रोखठोक पत्रकारिता, निर्भीड वृत्ती आणि व्यवस्थेवर टोकदार भाषेत बोट ठेवण्याची पद्धत यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले. अर्थात, या वादंगानंतर स्वतः सरन्यायाधीशांनी आपल्या विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला.”

निवेदिकेच्या या विधानाचा धागा पकडत सौरव दास यांनी अत्यंत परखडपणे आपले मत मांडले. ते म्हणाले, “हा अपमान केवळ वैयक्तिक अपमान नसून, देशातील युवा पिढीचा घोर अपमान आहे. देशातील तरुण आता गप्प बसणार नाहीत. आता ती वेळ आली आहे की तरुणांनी या देशाची धुरा आपल्या हातात घ्यावी आणि व्यवस्थेतील संपूर्ण भ्रष्टाचार मुळासकट उपटून फेकावा.”

देशातील सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करताना दास पुढे म्हणाले की, “सध्या जे लोक सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या सर्वोच्च पदांवर बसले आहेत, त्यांना केवळ स्वतःच्या स्वार्थाची आणि खुर्चीची काळजी आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. आज देशात पेपरफुटीचे एवढे मोठे गैरव्यवहार उघडकीस येत आहेत, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे, तरीही शासनकर्त्यांना याचे कसलेही सोयरसुतक नाही. त्यामुळेच आता तरुणांनी स्वतःची जबाबदारी स्वतः ओळखण्याची हीच खरी वेळ आहे.” या मुलाखतीमध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, देशातील शिक्षण व्यवस्थेच्या झालेल्या दुरवस्थेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या