Maharashtra Tourism : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या मराठवाड्यातील दोन महत्त्वाच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालतम किल्ला आणि बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला यांच्या डागडुजीसाठी सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मात्र, निधी मिळाला असला तरी या वास्तूंचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा मोठा तुटवडा पुरातत्व विभागाला भेडसावत आहे.
निधीचा विनियोग आणि नियोजित कामे
पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील तालतम किल्ल्यासाठी १० कोटी रुपये, तर बीडच्या धारूर किल्ल्यासाठी ११ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून किल्ल्यांची तटबंदी, जुन्या वास्तूंचे अवशेष आणि पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती केली जाणार आहे. विशेषतः ज्या ठिकाणांहून अनधिकृत प्रवेश होतो, त्या जागांची डागडुजी करून किल्ल्याला सुरक्षित केले जाईल.
मनुष्यबळाचे मोठे संकट
संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाच, या ऐतिहासिक वास्तूंच्या सुरक्षेसाठी गार्ड्सची संख्या अत्यंत कमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सुमारे २०० संरक्षित स्मारके आहेत. मात्र, या विशाल क्षेत्राच्या रक्षणासाठी केवळ ३४ कायमस्वरूपी आणि कंत्राटी सुरक्षा रक्षक उपलब्ध आहेत. स्मारकांचे संवर्धन तर होईल, पण त्यानंतर त्यांची दैनिन देखभाल आणि सुरक्षा करण्यासाठी माणसे कुठून आणायची, असा सवाल पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका जया वाहणे यांनी उपस्थित केला आहे.
किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व
- तालतम किल्ला: याला वैशागड किंवा जंजाळा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. अजिंठा-सातमाळा रांगांमध्ये असलेल्या या डोंगरी किल्ल्याला ५२ बुरूज असून त्याची तटबंदी खूप लांब आहे.
- धारूर किल्ला: सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला त्याच्या नागमोडी प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला प्रवेशासाठी केवळ एकच मार्ग आहे.
पुरातत्व विभागाने आता सरकारकडे वार्षिक देखभाल खर्च आणि अतिरिक्त कर्मचारी भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. केवळ दगड-विटांचे बांधकाम करून चालणार नाही, तर त्या वारशाचे जतन करण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.











