Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व अजित पवार यांना जाऊन उद्या एक महिना पूर्ण होत आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढताना गेल्या तीस दिवसांत राज्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान पूर्णतः पवार कुटुंबाभोवतीच केंद्रित असल्याचे दिसून आले. या एका महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक अभूतपूर्व बदल घडले असून, सत्तेची आणि संघटनेची सूत्रे आता नव्या नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहेत.
याच वादळी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. पतीच्या निधनानंतर निर्माण झालेली जबाबदारी स्वीकारत त्यांनी सत्तेच्या सर्वोच्च पदांपैकी एका पदाची शपथ घेतली. एवढेच नव्हे, तर काल रात्री उशिरा झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. यामुळे राज्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून, पक्षाची संपूर्ण धुरा आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. याच दरम्यान काल पासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हयरल होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिलीच अधिकृत पत्रकार परिषद पार पडली. मात्र, या पत्रकार परिषदेत नवनियुक्त अध्यक्षांना बोलण्याची पुरेशी संधी न मिळताच वरिष्ठ नेत्यांनी ती आटोपती घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी परिस्थिती हाताळताना सुनेत्रा वहिनींना फारसे बोलू दिले नाही, असे चित्र या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले.
या पत्रकार परिषदेपेक्षाही अधिक चर्चा सध्या एका व्हायरल व्हिडिओची होत आहे, ज्यामध्ये पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी नेत्यांमध्ये झालेली अंतर्गत ‘कुजबुज’ उघड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांच्या प्रश्नांना कसे सामोरे जावे, याबद्दलची रणनीती आखली जात असल्याचे दिसून येते. “पत्रकार जेव्हा किचकट किंवा उलटे-पालटे प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांची (सुनेत्रा पवारांची) मनस्थिती सध्या ठीक नाही, असे सांगून वेळ मारून न्या,” अशा आशयाचे संवाद या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांना थेट उत्तरे देण्यापासून रोखण्यासाठी ही योजना आखली गेल्याचे यावरून दिसून येते.
याच वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार सरोज अहिरे यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला असून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करणारी ठरली आहे. “अजितदादा जिवंत होते तेव्हा या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही, किमान आता तरी वहिनींच्या (सुनेत्रा पवार) जवळ आम्हाला जाऊ द्या,” असं त्या म्हणाल्या. या विधानामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत ‘कॅमेरा’ ठरला साक्षीदार; पडद्यामागची ‘कुजबुज’ आणि वरिष्ठ नेत्यांच्या नियोजनाचा असा झाला पर्दाफाश-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिलीच पत्रकार परिषद पार पडली. मात्र, या परिषदेत जे घडले त्यापेक्षा पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी नेत्यांमध्ये झालेली ‘गुफ्तगू’ आणि नियोजित रणनीतीची चित्रफीत (व्हिडिओ) सध्या राजकीय वर्तुळात वादाचा विषय ठरली आहे. कॅमेरा आणि माईक सुरू असल्याची पुसटशी कल्पनाही नसताना नेत्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद आता सार्वजनिक झाला असून, त्यातून पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर नेते येण्यापूर्वीच तिथे उपस्थित असलेल्या आमदारांची अस्वस्थता कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी आमदार सरोज अहिरे अत्यंत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करताना दिसल्या. “अजितदादा असताना कधी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा जवळ जाण्याची संधी या लोकांनी दिली नाही, किमान आता तरी माणसांना सुनेत्रा वहिनींच्या जवळ जाऊ द्यावे,” असं त्या म्हणाल्या.
त्याच वेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना कसे टाळायचे, याचे मार्गदर्शनही काही नेत्यांकडून दिले जात होते. “तुमचे अधिकृत निवेदन वाचन झाले की लगेच थांबा, पत्रकारांचे प्रश्न घेऊ नका. विशेषतः जेव्हा ते उलटे-पालटे किंवा कठीण प्रश्न विचारून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा ‘त्यांची मनस्थिती सध्या ठीक नाही’ असे सांगून वेळ मारून न्या,” अशी सूचना देताना काही नेते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याचवेळी सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झाले, त्यावेळी सुनेत्रा पवार यांना सांगितलं, तुमचं स्टेटमेंट करायचं तुम्ही, त्याच्या पलीकडे आम्ही बोलू.
ठरल्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी आपले अधिकृत वक्तव्य केले आणि पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच सर्व नेते घाईघाईने उठले. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः सुनेत्रा पवारांना तिथून बाहेर पडण्यास सुचवले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, सुनेत्रा पवार तिथून निघून गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पुन्हा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी परतले आणि आपल्या खुर्च्यांवर स्थिरावले. या संपूर्ण प्रसंगामुळे नवनियुक्त अध्यक्षांना जाणीवपूर्वक प्रश्नांपासून दूर ठेवले जात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
“हा क्षण आनंदाचा नव्हे, तर वेदनेचा”; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचे भावूक उद्गार-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अत्यंत गंभीर आणि भावूक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात कर्तव्याची जाणीव आणि कौटुंबिक दुःखाचा सुरेख संगम साधला. “आजचा हा प्रसंग माझ्यासाठी आनंदाचा क्षण नसून अत्यंत वेदनादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही पाणी आले.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींनी केली. त्या म्हणाल्या की, “आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून आपण अद्याप सावरलेलो नाही. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र, हा क्षण माझ्यासाठी केवळ पद स्वीकारण्याचा नसून, दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. पक्ष संघटना आणि दादांचा विचार पुढे नेण्यासाठी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.” हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता, तरीही त्यांनी आपला संयम कायम राखला.
पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्यासाठी केवळ एक राजकीय संघटना नसून एक परिवार आहे. समाजातील कोणत्याही घटकाला, मग तो शेतकरी असो वा कष्टकरी, आपण कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आणि समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास साधणे, हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले










