Home / महाराष्ट्र / Raj Thackeray : अजित पवार विमान अपघात प्रकरण: रोहित पवारांच्या मागणीला राज ठाकरेंचे समर्थन; सरकारवर डागली सडकून टीका

Raj Thackeray : अजित पवार विमान अपघात प्रकरण: रोहित पवारांच्या मागणीला राज ठाकरेंचे समर्थन; सरकारवर डागली सडकून टीका

Raj Thackeray : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या...

By: Team Navakal
Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी आणि संबंधित विमान कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मागणीसाठी त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते; मात्र पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने हे प्रकरण आता अधिक चिघळले आहे.

या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांनी आज ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विमान अपघाताशी संबंधित तांत्रिक बाबी आणि पोलिसांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली. “या न्याय्य लढ्यात राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभे राहतील,” असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर परखड शब्दांत ताशेरे ओढले. राज ठाकरे म्हणाले की, “जर एखादा लोकप्रतिनिधी पुराव्यासह तक्रार करत असेल, तर पोलीस प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून घेण्यास टाळाटाळ का करत आहेत? हे अनाकलनीय आहे.”

सरकारवर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले की, “अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे सरकारच जनतेच्या मनात संशयाची भूते नाचवत आहे, असे चित्र दिसत आहे. चौकशीला घाबरण्याचे कारण काय?” राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता या प्रकरणाला एक नवे राजकीय वलय प्राप्त झाले असून, सरकारवरचा दबाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अजित पवार अपघात प्रकरण: “अपघात धुक्यामुळे की धोक्यामुळे?” राज ठाकरेंचा सरकारला रोखठोक सवाल-
दिवंगत नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरून निर्माण झालेला संशयाचा धूर आता अधिक गडद झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणातील तांत्रिक विसंगती आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर अत्यंत परखड भाष्य केले. “अजित पवारांच्या निधनानंतर जनमानसात अनेक संशयाची भुते वावरत आहेत. मुळात हा अपघात नैसर्गिक धुक्यामुळे झाला की एखाद्या कटकारस्थानाच्या धोक्यामुळे, हाच कळीचा मुद्दा आहे,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरले.

आमदार रोहित पवार यांनी मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, “रोहित पवार यांनी या प्रकरणातील सर्व तांत्रिक बाबी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या आहेत. मात्र, धक्कादायक बाब अशी की, त्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करूनही पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास तयार नाही. जेव्हा पोलीस तक्रार स्वीकारण्यास नकार देतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने संशयाला वाव मिळतो.”

यावेळी त्यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यातील एका विशिष्ट घटनेचा उल्लेख करत प्रशासकीय दबावावर बोट ठेवले. “मरीन लाईन्समध्ये जेव्हा एक पोलीस अधिकारी रीतसर एफआयआर (FIR) लिहीत होते, तेव्हा अचानक तिथे पोलीस उपायुक्त (DCP) येतात आणि तक्रार न घेण्याचे आदेश देतात; हे कशाचे द्योतक आहे? जर कुटुंबातील एखादी व्यक्ती कायदेशीर तक्रार देऊ इच्छित असेल, तर सरकार त्यात अडथळे का आणत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या सत्तेतील सहभागाचा उल्लेख करत व्यवस्थेतील विसंगतीवर प्रहार केला. ते म्हणाले की, “एकीकडे सरकार असा दावा करते की राज्यात नागरिक कुठेही आपली तक्रार नोंदवू शकतात, मग प्रत्यक्ष कृतीच्या वेळी ही तत्परता कुठे जाते? सुनेत्रा वहिनी स्वतः सरकारचा भाग असतानाही जर त्यांच्या कुटुंबाला न्यायासाठी वणवण करावी लागत असेल, तर या संपूर्ण प्रकरणात नक्कीच ‘काळेबेरे’ आहे, असे म्हणायला जागा उरते.

“ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही सत्याचा शोध का नाही?” राज ठाकरेंचा सडेतोड सवाल; मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेकडे वेधले लक्ष-
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तंत्रज्ञान आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विमान अपघातात कितीही भीषण आग लागली किंवा विमानाचे अवशेष विखुरले गेले, तरी ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) कधीही नष्ट होत नाही; तो सुरक्षितच राहतो. मात्र, इतका काळ लोटूनही ब्लॅक बॉक्समधील माहिती समोर का आली नाही? सरकार केवळ संशयाची भुते नाचवत आहे,” अशा शब्दांत त्यांनी राज्य प्रशासनावर प्रहार केला.

राज ठाकरे यांनी मुख्यत्वे पोलीस प्रशासनाच्या अगतिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “तांत्रिक बाबी बाजूला ठेवल्या तरी मूळ प्रश्न ‘एफआयआर’ (FIR) नोंदवण्याचा आहे. जर एका सत्ताधारी कुटुंबातील सदस्याचा आणि विद्यमान आमदाराचा तक्रार अर्ज पोलीस स्वीकारत नसतील, तर सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करावी? पोलीस अधिकाऱ्यांवर कोणाचा आणि कसला दबाव आहे, की त्यांना गुन्हा नोंदवण्यापासून रोखले जात आहे? केवळ एक एफआयआर नोंदवायला सरकार इतके का घाबरत आहे?”

या संवेदनशील प्रकरणात राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले. “हे केवळ राजकारण नाही, तर एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूशी संबंधित सत्य शोधण्याचा विषय आहे. सुनेत्रा वहिनी स्वतः सत्तेत आहेत, त्यांनी या प्रकरणावर स्पष्टपणे बोलले पाहिजे. तसेच, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

शेवटी, या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन केले. सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आणि आगामी लोकसभा अधिवेशनातही हा मुद्दा पोटतिडकीने मांडला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर येण्यासाठी एका एफआयआरसाठी इतका संघर्ष करावा लागणे, हे दुर्दैवी आहे,” असे म्हणत राज ठाकरे यांनी रोहित पवार यांच्या मागणीला नैतिक आणि राजकीय बळ दिले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या