Bolivia Plane Crash: दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशात एक हृदयद्रावक विमान अपघात झाला. बोलिव्हियाच्या वायुसेनेचे ‘हर्क्युलिस’ विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अल अल्टो येथील गजबजलेल्या रस्त्यावर कोसळले.
या विमानात देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या नवीन छापलेल्या नोटांची वाहतूक केली जात होती. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
भरवस्तीत कोसळले विमान
अल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाला तांत्रिक अडचण आली आणि ते जवळच असलेल्या एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळले. विमानाने रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे विमानासह गाड्यांचाही चक्काचूर झाला.
मृतांमध्ये विमानातील कर्मचारी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक रुग्णवाहिकांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
रस्त्यावर उडाला नोटांचा पाऊस
या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमान कोसळल्यानंतर त्यातील नोटांची पाकिटे फुटली आणि रस्त्यावर सर्वत्र चलनी नोटा विखुरल्या गेल्या. ढिगाऱ्याभोवती जमा झालेल्या गर्दीतील काही लोक या नोटा उचलण्याचा प्रयत्न करताना दिसले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा (वॉटर कॅनन) वापरला.
विमानतळ तात्पुरते बंद
अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. बोलिव्हियाची राष्ट्रीय विमान कंपनी ‘बोलिव्हियाना डी एव्हिएशन’ने स्पष्ट केले आहे की, अपघाताग्रस्त विमान त्यांच्या ताफ्यातील नसून ते वायुसेनेचे मालकीचे होते.
अल अल्टो हे शहर ४,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले असून ते बोलिव्हियातील अत्यंत दाट लोकवस्तीचे केंद्र मानले जाते. या अपघाताचा सविस्तर तपास करण्यासाठी वायुसेनेने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.










