Actor Vijay Divorce News: तमिळ चित्रपटसृष्टीतील ‘थलापथी’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाचे संस्थापक विजय यांच्या कौटुंबिक आयुष्यात मोठी वादळे निर्माण झाली आहेत. विजय यांची पत्नी संगीता सोर्णलिंगम यांनी दीर्घकाळाच्या संसारानंतर आता कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट 1999 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष विवाह कायदा 1954 च्या तरतुदींनुसार हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला असून, सध्या हे प्रकरण जिल्हा न्यायालयासमोर प्रलंबित आहे.
घटस्फोटाच्या अर्जातील धक्कादायक खुलासे
संगीता यांनी आपल्या अर्जात अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठे तणाव निर्माण झाले होते. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असलेल्या विजय यांच्या कथित संबंधांमुळे संसारात दुरावा आल्याचा दावा संगीता यांनी केला आहे.
या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने समोर येणे आणि विजय यांनी त्याबाबत बाळगलेले मौन यामुळे आपल्याला समाजात मानहानी सहन करावी लागली, असे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. हा संसार आता केवळ कागदावरच उरला असून, तो पुन्हा सांधण्याची कोणतीही शक्यता उरली नसल्यानेच आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे संगीता यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत संगीता सोर्णलिंगम?
संगीता सोर्णलिंगम यांचा विजय यांच्या आयुष्यातील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा राहिला आहे. लंडनमध्ये स्थायिक असलेल्या एका प्रतिष्ठित श्रीलंकेच्या तमिळ उद्योगपतीची त्या कन्या आहेत. 1996 मध्ये विजय यांचा ‘पूवे उनक्कागा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर संगीता त्यांच्या मोठ्या चाहती बनल्या होत्या.
केवळ विजय यांना भेटण्यासाठी त्या लंडनहून थेट चेन्नईला आल्या होत्या. या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 25 ऑगस्ट 1999 रोजी मोठ्या दिमाखात त्यांचा विवाह पार पडला होता. संगीता सध्या लंडनमध्येच असून त्या आपल्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी सांभाळत असल्याचे समजते.
विजय आणि संगीता यांना दोन मुले असून त्यांचा मुलगा जेसन संजय आता दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावत आहे, तर मुलगी दिव्या शाशा ही बॅडमिंटन खेळाडू आहे. विजय यांनी नुकतीच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हे संकट त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते.










