MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मोठी तयारी सुरू केली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने आगामी लॉटरीसाठी सुमारे ३,५५० घरांची निश्चिती केली असून, ही घरे मुंबईतील विविध महत्त्वाच्या भागांत उपलब्ध होणार आहेत. विशेषतः गोरेगाव, विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर यांसारख्या परिसरांवर यंदाच्या लॉटरीत भर देण्यात आला आहे.
गोरेगावमध्ये घरांचा मोठा साठा
यंदाच्या लॉटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गोरेगाव येथील पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा समावेश. एकूण ३,५५० घरांपैकी तब्बल २,९५० घरे एकट्या गोरेगाव परिसरात आहेत. उर्वरित ६०० घरे विक्रोळी, कन्नमवार नगर आणि प्रतीक्षा नगर येथे उपलब्ध असतील. ही घरे प्रामुख्याने मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव आहेत. सध्या या घरांच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असून, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च किंवा एप्रिल महिन्यात या घरांची जाहिरात प्रसिद्ध होऊन सोडत प्रक्रिया सुरू होऊ शकते.
विविध उत्पन्न गटांसाठी संधी
गोरेगावमधील घरांची वर्गवारी पाहता, उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) २५०, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) १,७०० आणि कमी उत्पन्न गटासाठी (LIG) १,००० घरे उपलब्ध असतील. मुंबईतील घरांची वाढती मागणी पाहता, गेल्या वर्षी २,०३० घरांसाठी १.२९ लाख अर्ज आले होते. ही प्रचंड चढाओढ लक्षात घेता, यंदा घरांची संख्या वाढवल्याने जास्तीत जास्त लोकांना घर मिळण्याची आशा आहे.
भागांनुसार घरांची उपलब्धता
मुंबईतील इतर काही महत्त्वाच्या भागांतही म्हाडाचे फ्लॅट्स सोडतीसाठी उपलब्ध आहेत:
- तुंगा, पवई: ४२ फ्लॅट्स
- वडाळा (अँटॉप हिल): २७ फ्लॅट्स
- अंधेरी पश्चिम (JVPD): ७ फ्लॅट्स
- तार्डेव: ६ फ्लॅट्स
- कांदिवली आणि भायखळा: प्रत्येकी ९ आणि ६ फ्लॅट्स
किमतींची व्याप्ती: ३१ लाखांपासून ८ कोटींपर्यंत
म्हाडाच्या या लॉटरीत सर्व स्तरांतील लोकांसाठी घरांचे पर्याय आहेत. मानखुर्द (PMGP) येथील घरांची किंमत सर्वात कमी म्हणजे साधारण ३१ लाख रुपयांपासून सुरू होते. मध्यम उत्पन्न गटासाठी अंधेरी, पवई आणि वडाळा येथे दर्जेदार पर्याय आहेत. तर, उच्चभ्रू वर्गासाठी तार्डेव येथील क्रेसेंट टॉवरमध्ये सर्वात महागडा फ्लॅट उपलब्ध असून त्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये इतकी आहे.










