US-Israel Iran Attack : इराणचे शिया धर्मातील अत्युच्च नेते आयातुल्ला खामेनी हे अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त पसरताच जगभरातील शिया मुस्लीम चवताळून रस्त्यावर उतरले. इराणच्या तेहरान शहरातील जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकावत त्यांनी बदला घेण्याचा इशारा दिला. अमेरिका आणि इस्त्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत लाखो शिया मुस्लीम आज रस्त्यावर उतरले. पाकिस्तानच्या कराची आणि लाहोर शहरात संतप्त आंदोलकांनी अमेरिकी दूतावास आणि संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयावर चाल करीत प्रचंड तोडफोड केली. त्यांना थांबवण्यासाठी अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात कराचीत 12 आंदोलक ठार झाले. शिया मुस्लिमांच्या या संतापाचे हिंसक परिणाम आगामी काळात दिसतील हे निश्चित आहे.
इस्त्रायलने आज दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ले सुरूच ठेवलेले असताना इराणच्या नासिरिया, झंजन, रश्त, तेहरान, इस्फहान अशा अनेक शहरात लाखो शिया मुस्लीम रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अमेरिका व इस्त्रायलच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तेहरान शहरात असे आंदोलन सुरू असताना हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन वाजत होते. पण त्याला न जुमानता लोक आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहत होते. मशाद शहरात इमाम रझा दर्ग्याजवळ हजारो मुस्लीम एकत्र आले होते. इराणमध्ये हा निषेध सुरू असतानाच अफगाणिस्तानात बगदाद शहरातील अमेरिकी दुतावासावर हल्ला करण्यात आला. तिकडे पाकिस्तानात कराची शहरात अमेरिकी दुतावासावर हल्ला करीत आंदोलकांनी दुतावासाची प्रचंड तोडफोड केली. यावेळी दुतावासाच्या संरक्षणासाठी तैनात अमेरिकी सैनिकांनी गोळीबार केला. यात बारा नागरिक ठार झाल्याने अधिकच संताप उफाळला. शेवटी अश्रूधूर सोडून परिस्थिती आटोक्यात आणली. लाहोर शहरातही आंदोलकांनी अमेरिकी दूतावास कार्यालयावर हल्ला चढविला. आज अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेवर मधेही शिया मुस्लिमांनी आंदोलन केले. भारतातही शिया मुस्लिमांनी लाखोंच्या संख्येने एकत्र येत आंदोलन करीत अमेरिका व इस्त्रायलचा निषेध केला. आम्ही पोरके झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काश्मीरच्या लाल चौकात सकाळीच शिया मुस्लिमांनी एकत्र येत मोर्चा काढला. श्रीनगर शहरात संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध करीत होते. लेह-लडाख, कर्नाटकच्या बंगळुरु शहरात, मुंबईत, दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात, लखनौच्या इमामवाडा परिसरातही शिया मुस्लिमांनी जोरदार आंदोलन केले. यात महिलांची संख्यालक्षणीय होती.
लखनौ येथेही खामेनी यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले. लखनौतील शिया समुदायाने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले. जुन्या लखनौमधील सादतगंजसह अनेक भागांत काळे कपडे परिधान करून नागरिकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली. शिया धर्मगुरू, मौलाना कल्बे जवाद यांनी खामेनी यांच्या निधनानिमित्त तीन दिवसांचा शोक जाहीर केला. या काळात दुकाने व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करून नागरिकांना काळे झेंडे लावण्यास सांगितले. ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड आणि शिया धर्मगुरू मौलाना यासुब अब्बास यांनीही या घटनेचा निषेध करत मोठ्या प्रमाणात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले. खामेनी यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या उत्तर प्रदेशातील किंतूर परिसरातही नागरिकांनी मजलिस व प्रार्थनासभांचे आयोजन केले होते. तर राजस्थानातील अजमेरच्या तारागड येथील शिया समुदायाचे नेते सय्यद आसिफ अली यांनी तीन दिवसांचा शोक जाहीर केला. त्यांनी समुदायातील लोकांना उत्सव टाळण्याचे आणि शोक पाळण्याचे आवाहन केले. दोराई दर्गा येथेही शोकसभा पार पडली.
इराणने आज 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. अत्यंत तातडीने अयातोल्लाह अराफी यांनी नेता म्हणून निवडले आणि माघार न घेण्याचा निर्धार केला. आज चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या हल्ल्याबद्दल अमेरिका व इस्त्रायलचा जाहीर निषेध करीत इराणला जाहीर पाठिंबा दिला. तुर्कीएने इराणला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आता तुर्कीएवर हल्ला करणार असल्याची चर्चा सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रियादिलेली नाही.
इस्रायल-अमेरिका- इराण युद्धाच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ल्यांचे सत्र सुरू राहिले. इस्रायलच्या जेट विमानांनी 24 तासांत इराणवर 2,000 बॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. इस्रायलने इराणच्या तेहरानमधील अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात 200 हून अधिक इराणी नागरिक मृत्युमुखी पडले, तर 800 हून अधिक जण जखमी झाले. आज तेहरानमध्ये ठिकठिकाणी धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहायला मिळत होते. इराणनेही प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह अमेरिकेचे तळ असलेल्या आखाती देशात हल्ले केले. इस्रायलची राजधानी तेल अवीववर हल्ला करण्यात आला. यात सर्वाधिक हल्ले दुबईवर करण्यात आले. इराणने दुबईवर 137 क्षेपणास्त्र आणि 209 ड्रोनने मारा केला. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लक्ष्य करण्यात आले. विमानतळाच्या काही भागात आगही लागली. बुर्ज अल अरब हॉटेल आणि अमेरिकन नागरिक राहत असलेल्या इमारतीवरही हल्ला करण्यात आला. शारजा येथील एका शॉपिंग मॉलवर ड्रोन हल्ला करण्यात आला.

कतारची राजधानी दोहामध्ये 11 वेळा सायरन वाजले. ओमान बंदर आणि बहारिनच्या दुकम बंदरावरही इराणने क्षेपणास्त्रे सोडली. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधूनही स्फोटांचे आवाज ऐकू आले. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला. स्काय लाईट नावाचा हा तेल टँकर मुसंदम किनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर होता. त्याच्यावर पलामूचा झेंडा होता. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. जहाजावरील 20 जणांना सुरक्षितपणे बाहेरकाढण्यात आले.आज इराणने इस्रायल-अमेरिकेला धमकी दिली की, त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नसेल, असा हल्ला आम्ही करू. यानंतर अमेरिकेने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला उत्तर देत म्हटले की, त्यांनी (इराणने) असे करू नये. कारण जर इराणने असे केले तर आम्ही त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू की, ज्याची इराणने कधीही कल्पना केली नसेल.
अत्यंत सुरक्षित परिसरात सर्वोच्च नेते
खामेनी यांची हत्या कशी झाली?
तेहरान- अमेरिका आणि इस्रायल यांच्यात घनिष्ठ गुप्तचर सहकार्य आहे. अमेरिकेच्या मदतीने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. सर्वांचा खातमा करण्यात आला. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्यावर नजर ठेवली होती. त्यांनी इराणवर हल्ला करण्याची तयारी केली होती, वेळ ठरली होती. पण त्याचवेळी तेहरानमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीत खामेनी आणि 40 महत्त्वाचे अधिकारी एकत्र येणार असल्याची माहिती मिळली. हे कळताच अमेरिका आणि इस्रायलने हल्ल्याची वेळ बदलून या संधीचा फायदा घेतला. खामेनीसोबत आयआरजीसी प्रमुख, संरक्षण मंत्री आणि लष्करी परिषदेचे प्रमुख हेही लक्ष्य झाले. या बैठकीच्या ठिकाणावर सुमारे 30 बॉम्ब टाकून हा परिसरच उद्ध्वस्त केला.
सीआयएने या कारवाईत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक महिन्यांपासून खामेनी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांच्या दिनचर्येचा सखोल अभ्यासकरण्यात आला. शनिवारी सकाळी तेहरानमधील एका प्रमुख सरकारी परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे खामेनी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती तत्काळ इस्रायलला कळविण्यात आली. मूळ योजना रात्रीच्या अंधारात हल्ला करण्याची होती. मात्र, सर्व वरिष्ठ नेतृत्व एकाच परिसरात उपस्थित असल्याचे समजताच वेळ बदलून शनिवारी सकाळी हल्ला करण्यात आला. जेणेकरून एकाच वेळी मोठे लक्ष्य साध्य करता येईल. अयातुल्ला अली खामेनी (सर्वोच्च नेते), मोहम्मद पाकपूर (आयआरजीसी कमांडर-इन-चीफ), अजीज नासिरजादेह (संरक्षण मंत्री), ॲडमिरल अली शमखानी (लष्करी परिषदेचे प्रमुख), सय्यद माजिद मौसावी (एअरोस्पेस फोर्स कमांडर), मोहम्मद शिराझी (उप गुप्तचर मंत्री) व इतर प्रमुख व्यक्तींची ही बैठक होती. या कारवाईत इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा फटका बसला. ॲडमिरल शमखानी आणि मेजर जनरल पाकपूर हल्ल्यात ठार झाले.
इस्रायलमध्ये सकाळी सुमारे 6 वाजता लढाऊ विमानांनी उड्डाण केले. दोन तास पाच मिनिटांनंतर तेहरानच्या वेळेनुसार सकाळी 9.40 वाजता क्षेपणास्त्रांनी अत्यंत सुरक्षित अशा इराणच्या सरकारी परिसरात मारा सुरू केला. त्या परिसरातील एका इमारतीत वरिष्ठ सुरक्षा अधिकारी होते, तर खामेनी जवळच असलेल्या दुसऱ्या इमारतीत होते. हे ठिकाण निश्चित होताच क्षेपणास्त्र माऱ्यासह सुमारे 30 बॉम्बही टाकण्यात आले. मागील वर्षी झालेल्या 12 दिवसांच्या संघर्षादरम्यान खामेनी आणि आयआरजीसी कशाप्रकारे संवाद साधतात, हालचाल करतात याचा अभ्यास अमेरिका करत होती. त्यातूनच त्यांच्या हालचालींचे अचूक अंदाज बांधणे शक्य झाले. इतक्या संवेदनशील काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकाच ठिकाणी एकत्र येणे आणि खामेनी यांची त्याच परिसरात उपस्थिती ही गंभीर चूक ठरली.
खामेनींच्या वडिलांचे आजोबा
मूळचे उत्तर प्रदेशातील किंतूरचे
लखनौ – इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींची हत्या आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर हे छोटे गाव पुन्हा चर्चेत आले आहे. या गावाचा इराणच्या धर्माधारित राजवटीशी ऐतिहासिक संबंध आहे. अली खामेनींच्या वडिलांचे आजोबा सैयद अहमद मुसावी हे मूळचे भारतातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर या गावातील आहेत. हे गाव लखनौपासून सुमारे 50 किमी अंतरावर असून, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किंतूर या गावाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
किंतूर हे शिया परंपरेतील विद्वत्तेचे केंद्र मानले जाते आणि ते आयातोल्ला रुहोल्ला मुसावी खोमेनी यांचे आजोबा सैयद अहमद मुसावी यांचे जन्मस्थान आहे. सैयद अहमद मुसावी यांचा जन्म सुमारे 1800 च्या सुमारास किंतूर येथे झाला. 1830 च्या दशकात त्यांनी भारतातून इराकमधील नजफ येथे स्थलांतर केले. नजफ हे शिया शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यानंतर 1834 मध्ये ते इराणमधील खोमेन शहरात स्थायिक झाले. त्यांनी आपल्या नावामध्ये हिंदी ही उपाधी कायम ठेवली. ती त्यांचे भारतीय मूळ असल्याची ओळख दर्शवते. इराणी नोंदींमध्येही ही बाब नमूद आहे. पुढे त्यांच्या कुटुंबाने इराणमध्ये धार्मिक आणि राजकीय पातळीवर मोठा प्रभाव निर्माण केला.
किंतूर आणि उत्तर प्रदेश 18 व्या शतकात पर्शियन व शिया विद्वानांचे केंद्र होते. इराण आणि भारतातील सांस्कृतिक व धार्मिक देवाणघेवाणीचे हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. ही भारताशी जोडलेली ऐतिहासिक कडी 1979 च्या इराणी क्रांतीच्या नेत्याशी संबंधित असल्याने आजही संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय आहे.










