Trump slams Nato over Iran war assistance : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांवर निशाणा साधत त्यांना सुनावले. इराणसोबतच्या युद्धात ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ सुरक्षित ठेवण्यासाठी मदत न करणे ही त्यांची मोठी चूक असल्याचे म्हणत त्यांनी नाटो देशांवर टीका केली.
जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सागरी मार्गावर युद्धाचे सावट असतानाही, मित्रराष्ट्रांनी हात झटकल्यामुळे ट्रम्प संतापलेले पाहायला मिळाले.
“आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही”
व्हाईट हाऊसमध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, बहुतेक नाटो मित्रराष्ट्रांनी या युद्धात सामील होण्यास नकार दिला आहे. अनेक देश या युद्धाला बेकायदेशीर मानत आहेत.
यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, “आम्हाला नाटोच्या मदतीची गरज नाही, पण अशा कठीण प्रसंगी त्यांनी तिथे असायला हवे होते. युक्रेनला वाचवण्यासाठी आम्ही अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण जेव्हा आम्हाला गरज पडली, तेव्हा हे देश काहीच करत नाहीत.”
ब्रिटन आणि कीर स्टार्मर यांच्यावर विशेष टीका
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात ब्रिटनवर सर्वात कठोर शब्दांत टीका केली. इराणवरील इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये ब्रिटनने सहकार्य न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांच्या मते, पंतप्रधान कीर स्टार्मर सत्तेत आल्यापासून अमेरिका आणि ब्रिटनमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. या युद्धाने मित्रराष्ट्रांच्या संबंधांची खरी परीक्षा घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
युरोपातील नेत्यांची भूमिका
दुसरीकडे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे की, फ्रान्स या संघर्षाचा भाग नाही आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ उघडण्याच्या कोणत्याही मोहिमेत ते सहभागी होणार नाहीत. युरोपियन युनियनच्या राजनैतिक अधिकारी काजा कल्लास यांनीही हे युरोपचे युद्ध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.
युद्धाची भीषणता आणि अंतर्गत विरोध
इराणसोबत सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक तेल व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत केवळ मोजकीच जहाजे या मार्गावरून जाऊ शकली आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या अंतर्गत प्रशासनातही या युद्धावरून मतभेद समोर येत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जो केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, इराणपासून अमेरिकेला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र, इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी कोणत्याही शस्त्रसंधीला नकार दिला आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल पराभव स्वीकारत नाहीत, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे.










