Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Case : अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा बाजार; पाखंडी ज्योतिषी अशोक खरातवर सातवा गुन्हा दाखल, शिर्डीत तरुणीवर अत्याचार

Ashok Kharat Case : अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा बाजार; पाखंडी ज्योतिषी अशोक खरातवर सातवा गुन्हा दाखल, शिर्डीत तरुणीवर अत्याचार

Ashok Kharat Case : आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या गोंडस नावाखाली महिलांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या पापांचा पाढा...

By: Team Navakal
Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case : आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या गोंडस नावाखाली महिलांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या पापांचा पाढा आता वाचला जात आहे. नाशिकमधील अटकेनंतर खरातच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक पदर उलगडत असून, आता शिर्डीमध्ये त्याच्याविरोधात सातवा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन वारंवार आपल्या वासनेचा शिकार बनवले. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) अत्यंत वेगाने सुरू आहे.

विश्वासाला तडा आणि दैवी शक्तीची भीती-
अधिकच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे कुटुंब आपल्या शेतात नवीन घर बांधण्यासाठी वास्तूशास्त्राचा सल्ला घेण्यासाठी अशोक खरातकडे गेले होते. ‘कॅप्टन’ आणि ‘ज्योतिष तज्ञ’ अशी प्रतिमा असलेल्या खरातवर विश्वास ठेवून हे कुटुंब त्याच्या संपर्कात आले. पहिल्या दोन भेटींत विश्वास संपादन केल्यानंतर, तिसऱ्या भेटीत कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तिने कोणत्या शैक्षणिक शाखेत प्रवेश घ्यावा, याबद्दल खरातचा सल्ला मागितला. नेमका याच संधीचा फायदा घेत नराधम खरातने या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, जुलै ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत खरातने तिला गुंगीचे औषध देऊन एकूण चार वेळा तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर या कृत्याची कुठेही वाच्यता केल्यास “माझ्याकडे असलेल्या अफाट दैवी शक्तीचा वापर करून तुझ्या आई-वडिलांना संपवून टाकीन,” अशी प्राणघातक धमकीही त्याने दिली होती. या दहशतीमुळे पीडिता अनेक दिवस गप्प होती, मात्र खरातच्या अटकेनंतर तिने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू
नाशिकच्या सत्र न्यायालयाने अशोक खरातची रवानगी २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची कसून चौकशी करत असून, दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतील महिलांना ज्योतिष आणि अध्यात्माच्या नावाखाली फसविले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टला मिळालेला कोट्यवधींचा निधी आणि त्याचा वापर यावरही पोलिसांची करडी नजर आहे.

‘मी महादेवाचा अवतार’; तांब्याच्या पेल्यातील तीर्थ पाजून तरुणीवर अत्याचार: भोंदू अशोक खरातचा आणखी काळा चेहरा पुन्हा एकदा उघड-
स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या पाखंडी साम्राज्यातील शोषणाची धक्कादायक मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिर्डी येथे दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या क्रूरतेचे नवीन आणि अंगावर शहारे आणणारे पैलू समोर आले आहेत. “मी साक्षात महादेवाचा अवतार आहे,” असे भासवून आणि दैवी शक्तीची भीती दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप आता खरातवर करण्यात आला आहे.

विश्वासाचा गैरफायदा आणि संमोहनाचे जाळे-
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, हे प्रकरण २०२१ पासून सुरू झाले. पीडितेचे कुटुंबीय आपल्या शेतात घर बांधण्यासाठी मुहूर्त आणि वास्तूशास्त्राचा सल्ला घेण्यासाठी खरातच्या संपर्कात आले होते. “तुमची जागा बाधित आहे, पुढील दोन वर्षे घर बांधू नका,” असे सांगून खरातने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि त्यांना वारंवार भेटीसाठी बोलावले.

जुलै २०२४ मध्ये नाशिक येथील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टी’ कार्यालयात ही तरुणी आपल्या आई-वडिलांसह करियरच्या मार्गदर्शनासाठी गेली होती. यावेळी खरातने “मला हिच्याशी स्वतंत्रपणे बोलायचे आहे,” असे सांगून पालकांना केबिनबाहेर पाठवले. त्यानंतर त्याने तरुणीला तांब्याच्या पेल्यातून काहीतरी ‘तीर्थ’ किंवा पाणी प्यायला दिले. ते पाणी पिताच तरुणीला ग्लानी येऊ लागली आणि तिचे डोके जड पडले.

अघोरी कृत्ये आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी-
तक्रारीत नमूद केल्यानुसार, तरुणीचे भान हरपत असतानाच खरातने तिच्या डोक्यावर तो तांब्याचा पेला ठेवून काही अघोरी मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली. तिलाही त्याच्या मागे मंत्र बोलण्यास भाग पाडले. “मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे अफाट दैवी शक्ती आहे, मी तुझे करियर सुवर्णमयी करेन,” असे आमिष दाखवत त्याने तरुणीचे लैंगिक शोषण केले.

जेव्हा पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खरातने आपल्या कथित ‘दैवी शक्ती’चा धाक दाखवला. “जर याबद्दल कोणाला काही सांगितलेस, तर तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल,” अशी भीषण भीती त्याने घातली. या दहशतीखाली जुलै ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या काळात खरातने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या