Parth Pawar Meet Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळल्यामुळे, या चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतरचे संशयाचे धुके-
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक आणि अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या मृत्यूभोवती असलेल्या संशयाच्या धुक्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांनीही या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संशय व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर, आपल्या कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी आणि या प्रकरणातील गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी पार्थ पवार यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
मराठी अस्मिता आणि पक्षीय नेतृत्व-
या भेटीमागे केवळ कौटुंबिक दुःख नसून राजकीय कृतज्ञतेचाही पदर असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच घडलेल्या घडामोडींमध्ये, पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. मात्र, राज ठाकरे यांनी ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असायला हवा’ अशी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पवार कुटुंबाला दिलेल्या या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थ पवार यांनी ‘शिवतीर्था’ची पायरी चढली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल दीड तास चाललेल्या या प्रदीर्घ भेटीत केवळ सांत्वन किंवा कृतज्ञता असावी की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव, यावर आता खल सुरू झाला आहे.











