Home / महाराष्ट्र / Bhondu Baba : भोंदूगिरीचा हैदोस: कथित दैवी अवताराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; महाराष्ट्रात भोंदूगिरीचा सुळसुळाट..

Bhondu Baba : भोंदूगिरीचा हैदोस: कथित दैवी अवताराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; महाराष्ट्रात भोंदूगिरीचा सुळसुळाट..

Bhondu Baba : धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या महिलांची दिशाभूल करून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबांचे काळे कारनामे एकामागून...

By: Team Navakal
Bhondu Baba
Social + WhatsApp CTA

Bhondu Baba : धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या महिलांची दिशाभूल करून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबांचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. ‘कथित पूजे’चा बहाणा करून आणि स्वतःला देवाचा अवतार भासवून या नराधमांनी महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले असून, सध्या पोलीस अशा फरार भोंदू बाबांचा शोध घेत आहेत.

‘राधा-कृष्ण’ कथा आणि अशोक खरातचे दुष्कृत्य-
भोंदूगिरीचा पहिला प्रकार अशोक खरात याच्या संदर्भात समोर आला आहे. “मागच्या जन्मी तू राधा होतीस आणि मी कृष्ण होतो, या जन्मी आपले मीलन होणे विधीसंचित आहे,” अशा भ्रामक आणि भावनिक जाळ्यात ओढून खरातने अनेक महिलांचे मानसिक आणि लैंगिक शोषण केले. दैवी संबंधांचा आधार घेऊन त्याने महिलांना संभ्रमात टाकले आणि ‘विशिष्ट पूजे’च्या नावाखाली त्यांच्या अब्रूशी खेळ मांडला. या प्रकरणी पीडित महिलांनी धाडसाने समोर येत तक्रारी दाखल केल्या आहेत.

वसईचा ‘कथित महादेव’ ऋषिकेश वैद्य फरार-
असाच संतापजनक प्रकार पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात उघडकीस आला आहे. ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदूने “मी साक्षात महादेवाचा अवतार आहे,” असे भासवून महिलांची फसवणूक केली. अध्यात्मिक शक्तीचा वापर करून संकटे दूर करण्याचा दावा करत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका पीडितेने दिली आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच हा भोंदू वैद्य सध्या पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पुणे जिल्ह्यातील ‘शिवदत्त आश्रमा’चा काळा चेहरा-
भोंदूगिरीचे हे लोण आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील ‘शिवदत्त आश्रमा’त नवनाथ पंढरीनाथ गवळी ऊर्फ ‘मामा’ या भोंदूबाबाचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत. आश्रमात दर्शनासाठी आणि समस्या निवारणासाठी येणाऱ्या महिलांना लक्ष्य करून या बाबाने त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रार होताच हा भोंदू मामा पसार झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाईची मागणी-
या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम’ (जादूटोणाविरोधी कायदा) अंतर्गत या भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

१५०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद; ‘बंदूक’ आणि ‘घुंगरू’ बाबांच्या विचित्र प्रकारांमुळे संताप-
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या भोंदूगिरीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये बुवाबाजी आणि अघोरी प्रथांशी संबंधित सुमारे १५०० हून अधिक घटनांची पोलीस दप्तरी नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.अलीकडेच उघडकीस आलेल्या अशोक खरात आणि ऋषिकेश वैद्य यांसारख्या प्रकरणांनंतर, सोशल मीडियावर भोंदू बाबांच्या अजब दाव्यांचे आणि कृतींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

आकडेवारीतून भयावह वास्तव समोर-
राज्यातील भोंदूगिरीचा पाढा वाचताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सध्या काही विशिष्ट जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४९१ गंभीर घटनांची नोंद झाली असून, यामध्ये तब्बल १८०६ आरोपींचा समावेश आहे. छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असले, तरी अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेणाऱ्या या टोळ्यांचे जाळे खोलवर पसरले असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सोशल मीडियावरील धक्कादायक व्हिडिओ आणि अघोरी प्रकार-
अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, इंटरनेटवर अशा काही भोंदू बाबांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत जे पाहून सर्वसामान्यांच्या अंगावर काटा येईल-
१.’घुंगरू बाबा’ आणि चिमुकलीची सुरक्षा- एका व्हिडिओमध्ये ‘घुंगरू बाबा’ म्हणून ओळखला जाणारा एक भोंदू एका लहान बाळावर काहीतरी अघोरी प्रयोग करताना दिसतोय. यात एक महिला आपल्या चिमुकलीला घेऊन या बाबासमोर उभी आहे आणि तो बाबा त्या मुलीच्या कपाळाला काहीतरी लावत अघोरी विधी करत आहे. हा बाबा त्याच्या अंगावर बांधलेले घगरु वारंवारं वाजवताना दिसत आहे.

2.’बंदूक बाबा’चा बनाव: दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ‘बंदूक बाबा’ नावाने चर्चेत आलेल्या भोंदूच्या हातात एक खेळण्यातील पिस्तूल दिसत आहे. समोर बसलेल्या एका महिलेवर तो हे खोटे पिस्तूल रोखून धरतो आणि तिच्या अंगातील ‘बाधा’ दूर करण्याचा बनाव करत पिस्तूल चालवण्याचे नाटक करतो. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या हास्यास्पद आणि धोकादायक क्लृप्त्या वापरून लोकांच्या मानसिकतेशी खेळले जात आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी आव्हानात्मक-
महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात ही भोंदूगिरी नव्या रूपात समोर येत आहे. “एकीकडे महिलांचे लैंगिक शोषण आणि दुसरीकडे अशा अघोरी प्रयोगांच्या माध्यमातून लोकांची आर्थिक लूट केली जात आहे,” असे मत व्यक्त केले जात आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन-
भोंदू बाबांच्या या वाढत्या जंत्रीमुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणताही आजार किंवा संकट दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा आणि चमत्कारांचा दावा करणाऱ्या अशा भोंदूंकडे पाठ फिरवावी. सोशल मीडियावरील हे व्हिडिओ केवळ मनोरंजनाचा भाग नसून, ते समाजातील वैचारिक अधोगतीचे लक्षण आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या