Chemically Ripened Mangoes: यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याचे उत्पादन घटले असून बाजारात आवक कमी आहे. याचाच फायदा घेत काही नफेखोर व्यापारी रसायनांचा वापर करून कच्चे आंबे पिकवत असल्याचे समोर आले आहे.
नुकतेच हैदराबादमध्ये पोलिसांनी 7 टन विषारी आंबे जप्त केले असून, या कारवाईमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्राहकांनी आपल्या आरोग्याशी खेळू नये यासाठी ‘नैसर्गिक’ आणि ‘रासायनिक’ आंब्यांमधील फरक ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.
आंबा नैसर्गिक की रासायनिक? असे ओळखा :
- रंगातील फरक: नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा सगळीकडून एकसारखा पिवळा नसतो. त्यात कुठे हिरवे तर कुठे पिवळे छटा दिसतात. याउलट, रसायनांनी पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा किंवा सोनेरी आणि अतिशय चमकदार दिसतो.
- आतील भाग: रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा बाहेरून पिवळा दिसला तरी आतून तो पांढरट किंवा कच्चा असू शकतो. नैसर्गिक आंबा आतून पूर्णपणे केशरी किंवा गडद पिवळा असतो.
- पाण्याची चाचणी: एक बादली भरून पाण्यात आंबा टाका. जर आंबा तळाला जाऊन बसला तर तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे, असे समजावे. जर आंबा पाण्यावर तरंगत असेल, तर तो रसायनांच्या मदतीने पिकवलेला असण्याची शक्यता जास्त असते.
- चव आणि वास: नैसर्गिक आंब्याचा सुगंध अत्यंत गोड आणि मनमोहक असतो. रसायनांनी पिकवलेल्या आंब्याला असा सुगंध नसतो आणि खाताना घशात खवखव किंवा मळमळ जाणवू शकते.
विषारी रसायनांचा वापर आणि धोके
काही व्यापारी आंबे पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’ आणि ‘डायमंड रायप इथिलिन’ यांसारखी धोकादायक रसायने वापरत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशी फळे खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि दीर्घकाळात गंभीर आजार होऊ शकतात. पोलिसांनी आवाहन केले आहे की, केवळ चमक पाहून आंबा खरेदी करू नका. सेंद्रिय किंवा ऑर्गनिक लेबल असलेल्या आंब्यांचीही नीट खातरजमा करूनच खरेदी करा.
हे देखील वाचा –










