India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उद्देशून एक प्रक्षोभक विधान केले असून, भविष्यातील युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते भारताच्या अगदी खोलवर म्हणजेच कोलकात्यापर्यंत पोहोचू शकते, अशी पोकळ धमकी दिली आहे. सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला.
काय म्हणाले पाकिस्तानचे संरक्षण मंत्री?
ख्वाजा आसिफ यांनी कोणताही पुरावा न देता असा दावा केला की, भारत ‘फॉल्स फ्लॅग’ ऑपरेशन करण्याचा कट रचत आहे. “जर भारताने यावेळी असा कोणताही प्रयत्न केला, तर आम्ही हे युद्ध थेट कोलकात्यापर्यंत नेऊ,” असे ते म्हणाले.
आसिफ यांनी पुढे असेही म्हटले की, पुढच्या वेळी संघर्ष झाल्यास तो केवळ 200 ते 250 किमीपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर आम्ही त्यांच्या घरात घुसून मारू. गेल्या वर्षीच्या संघर्षात भारताला नामुष्की सहन करावी लागली होती, असा दावा देखील त्यांनी केला.
भारताचे सडेतोड उत्तर: ‘अभूतपूर्व प्रत्युत्तर देऊ’
पाकिस्तानच्या या धमकीला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही आगळीक केल्यास भारताकडून ‘अभूतपूर्व आणि निर्णायक’ कारवाई केली जाईल. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेले उत्तर पाकिस्तान अजूनही विसरलेला नाही.
राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन अजून संपलेले नाही. जर पाकिस्तानने पुन्हा अशा घाणेरड्या कृती केल्या, तर आमचे सशस्त्र दल त्यांना कधीही न विसरता येणारे चोख प्रत्युत्तर देईल.”
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ
या वादाची मुळे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात आहेत, ज्यामध्ये 26 भारतीय शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भीषण हल्ले केले होते. दोन्ही देशांमधील हा संघर्ष 4 दिवस चालला होता आणि शेवटी 10 मे 2025 रोजी थेट चर्चेनंतर युद्धविराम झाला होता.
माजी उच्चायुक्तांचेही वादग्रस्त विधान
केवळ संरक्षण मंत्रीच नाही, तर भारतासाठी पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त राहिलेल्या अब्दुल बासित यांनीही मुक्ताफळे उधळली आहेत. “जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही कोणताही विचार न करता मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू,” असे त्यांनी एका चर्चेदरम्यान म्हटले. दरम्यान, पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरही सध्या अफगाणिस्तानसोबत तणाव सुरू आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रादेशिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
हे देखील वाचा – USA Iran War: तेहरानवर अमेरिकेचा भीषण हल्ला! इराणचे बडे लष्करी अधिकारी मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा










