Who is Akash More Congress Baramati Candidate : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सर्वस्व पणाला लावले होते, मात्र काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने आता बारामतीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने एडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असून, आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत एडव्होकेट आकाश मोरे?
आकाश मोरे हे बारामतीच्या राजकारणातील परिचयाचा चेहरा असून ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
- राजकीय वारसा: आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे वडील विजय मोरे यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम पाहिले आहे.
- ग्रामीण चेहरा: बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोरे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे.
- जातीय समीकरण: बारामती मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान निर्णायक ठरते. आकाश मोरे हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने काँग्रेसने त्यांना संधी देऊन मोठी खेळी खेळली आहे.
- अनुभव: यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना बारामतीतून उमेदवारी दिली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
बारामतीत आता तिरंगी लढत
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार आज आपला अर्ज भरत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने आणि शिवसेना (UBT) गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवत ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या बाजूने कल दिला होता. मात्र, काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता बारामतीची ही पोटनिवडणूक सुनेत्रा पवार, आकाश मोरे आणि लक्ष्मण हाके यांच्यात विभागली जाणार आहे.
बिनविरोधसाठी ‘दिल्ली’पर्यंत धाव?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अद्याप आशा सोडलेली नाही. “बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची भूमिका आहे. यासाठी गरज पडल्यास आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या दौऱ्यामुळे आणि आकाश मोरे यांच्या उमेदवारीमुळे सध्यातरी ही लढत अटळ दिसत आहे.










