Artemis-2 surpasses Apollo’s record – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या महत्त्वाकांक्षी आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी अवकाशात पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर पोहोचण्याचा अपोलो-13 यानाचा विक्रम मोडून आपल्या नावे नवा विक्रम स्थापित केला आहे.
अपोलो-13 ही मोहीम नासाने 1970 यशस्वी केली होती. या मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीपासून 2 लाख 48 हजार 655 मैल अंतर गाठून मानवाने अवकाशात सर्वाधिक अंतर पार करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.तेव्हापासून सुमारे 56 वर्षे हा विक्रम अबाधित होता. सुमारे 55 वर्षांनंतर नासाने आता आर्टेमिस -2 ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीर चांद्र मोहिमेवर गेले आहेत. या मोहिमेतील ओरायन यानाने काल अवकाशात 2 लाख 48 हजार 655 मैलांचे अंतर पार करून अपोलो-13 चा विक्रम मागे टाकला.
अवकाशात मानवविरहित यानांनी याहून अधिक अंतर पार केले आहे. मात्र मानवसहित मोहिमेत एवढ्या दूर जाणे धोकादायक आणि प्रचंड जोखमीचे असते. आर्टेमिस -2 मोहिमेतही काल एक असा टप्पा आला की ओरायन यानाचा तब्बल चाळीस मिनिटांसाठी पृथ्वीशी पूर्णपणे संपर्क तुटला होता. ओरायन यानाने जेव्हा चंद्राच्या पलिकडच्या भागात प्रवेश केला तेव्हा पृथ्वीशी संपर्क ज्या रेडिओ लहरींद्वारे केला जातो त्या रेडिओ लहरी चंद्राचा पृष्ठभाग भेदून पार होऊ शकत नव्हत्या. हे असे होणार हे नासाला अपेक्षित होते.संपर्क तुटलेल्या या 40 मिनिटांत ओरायन यान 2 लाख 52 हजार 756 मैलाचा म्हणजेच सुमारे 4 लाख 6 हजार 771 किलोमीटर एवढा सर्वाधिक अंतरावर पोहोचले होते.तेथून ते पृथ्वीच्या दिशेने वळले.
ओरायन यानाने गाठलेले हे अंतर आतापर्यंत मानवाने अवकाशात गाठलेले सर्वाधिक अंतर ठरले आहे. हा नवा विक्रम आता आर्टेमिस-2 मोहिमेने प्रस्थापित केला आहे. दहा दिवसांच्या या मोहिमेत रिड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि ख्रिस्तीना कोच हे तीन नासाचे अंतराळवीर आणि जेरेमी हॅन्सन हे एक कॅनडाचे अंतराळवीर असे एकूण चार अंतराळवीर आहेत. ही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी म्हणजेच फ्लाय बाय मोहीम आहे. या मोहिमेत अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नाहीत.तर आगामी चांद्र मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित करून दहा दिवसांनी पृथ्वीवर परतणार आहेत.
1 एप्रिल रोजी केनेडी अवकाश तळावरून नासाच्या स्पेशल लाँच सिस्टीम (एसएलएस) या शक्तिशाली रॉकेटच्या साह्याने ओरायन यान चार अंतराळवीरांना घेऊन आकाशात झेपावले. पृथ्वीची कक्षा पार करताना रॉकेट यानापासून विलग झाले. त्यानंतर ओरायनचा प्रवास चंद्राच्या दिशेने सुरू झाला आहे. या मोहिमेत ओरायन यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 4 हजार 67 मैल अंतरापर्यंत जवळ पोहोचले आहेत. तिथून अंतराळवीरांना प्रत्यक्ष डोळ्यांनी चंद्राचा पृथ्वीच्या विरुद्ध दिशेकडील भाग पाहता येईल. तसेच चंद्र सूर्याच्या समोरून जाणार असल्याने सूर्यग्रहणही पाहता येईल.
हे देखील वाचा –
लॉकडाऊन काळात बाप-लेकाचा घेतला होता बळी; न्यायालयाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना सुनावली फाशी










