IRCTC New Website : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांचा डिजिटल अनुभव सुधारण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आपल्या तिकीट बुकिंगच्या संकेतस्थळाची पूर्णपणे पुनर्रचना केली असून, त्याचे प्रायोगिक व्हर्जन प्रवाशांसाठी खुले केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या आधीच्या आश्वासनानुसार, 15 जुलैपर्यंत ही नवी यंत्रणा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.
ही नवीन सिस्टीम सध्या सुरू असलेल्या मूळ वेबसाईटवरूनच हाताळता येणार आहे. प्रवासी या नवीन रचनेचा वापर करून आपले अनुभव आणि सूचना रेल्वेकडे नोंदवू शकतात, ज्याचा उपयोग अंतिम वेबसाईट अधिक सक्षम करण्यासाठी केला जाईल. या सुधारणेसोबतच पुढील काही दिवसांत नवीन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम देखील जोडली जाणार आहे.
नवीन वेबसाईटमध्ये काय बदलले? प्रवाशांना मिळणारे 4 मुख्य फायदे
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार, या नव्या बदलाचा मुख्य उद्देश प्रवाशांना कोणत्याही गोंधळाशिवाय तिकीट बुक करता यावे हा आहे. वेबसाईटच्या नव्या रचनेमुळे प्रवाशांना खालील मोठे फायदे मिळतील:
- अनावश्यक कॅप्चा आणि जाहिराती बंद: तिकीट काढताना समोर येणारे अनावश्यक कॅप्चा, पॉप-अप जाहिराती आणि स्क्रीनवर चमकणारे ग्राफिक्स आता पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे बुकिंग करताना होणारा मनस्ताप थांबणार आहे.
- सर्व सीट एकाच ठिकाणी उपलब्ध: प्रवाशांना आता स्लीपर, थर्ड एसी किंवा इतर वर्गांची जागा तपासण्यासाठी वेगवेगळ्या बटणांवर क्लिक करावे लागणार नाही. सर्व प्रकारच्या क्लासची सीट उपलब्धता आता एकाच पानावर एकत्रितपणे पाहता येईल.
- प्रवाशांची माहिती राहिल सुरक्षित: जे नागरिक वारंवार ट्रेनने प्रवास करतात, त्यांना दरवेळी प्रवाशांचे नाव, वय आणि ओळखपत्र मॅन्युअली टाईप करावे लागणार नाही. ही माहिती आधीच सेव्ह करून ठेवता येईल.
- बुकिंगचे टप्पे झाले कमी: तिकीट पेमेंट करण्यासाठी लागणारे बुकिंगचे टप्पे कमी करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फायदा ‘तात्काळ’ तिकीट काढणाऱ्यांना होईल, कारण तिथे काही सेकंदांचा उशीरही तिकीट मिळण्यापासून वंचित ठेवू शकतो.
प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या आधारे होणार अंतिम बदल; अशी करा लॉगिन
आयआरसीटीसीच्या या नवीन प्रायोगिक आवृत्तीचा मुख्य उद्देश प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे हा आहे. सर्व तांत्रिक बाजू आणि प्रवाशांचे अनुभव तपासल्यानंतरच ही नवी वेबसाईट मुख्य पोर्टल म्हणून कायम केली जाईल.
या नवीन सुविधेचा वापर करण्यासाठी प्रवासी थेट https://www.irctc.co.in/eticket/ या लिंकवर जाऊ शकतात किंवा आयआरसीटीसीच्या नेहमीच्या होमपेजवर दिसणाऱ्या ‘बीटा वेबसाईट’ या पर्यायाची निवड करू शकतात.
भारतात दररोज सरासरी तब्बल 14.5 लाख ट्रेन तिकिटांची ऑनलाईन विक्री होते, ज्यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या डिजिटल बुकिंग यंत्रणांपैकी एक आहे. नवीन वेबसाईट आणि आधुनिक पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वेबसाईट हँग होण्याचा किंवा पेमेंट अडकण्याचा त्रास कायमचा दूर होण्याची शक्यता आहे.











