ODI World Cup 2027 Format: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२७ मधील पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या रचनेत ऐतिहासिक बदल करण्याची घोषणा केली आहे. स्पर्धा अधिक चुरशीची आणि रंजक बनवण्यासाठी हा नवीन फॉरमॅट मंजूर करण्यात आला आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत एकूण 14 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. बाद फेरी म्हणजेच बाद फेऱ्यांपूर्वी आता संघांना 3 वेगवेगळ्या आव्हानात्मक टप्प्यांतून जावे लागणार आहे.
हा बहुप्रतीक्षित विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. स्पर्धेचे आयोजन 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर २०२७ या कालावधीत केले जाईल.
असा असेल विश्वचषकाचा नवा ‘सुपर7’ फॉर्म्युला
नवीन नियमांनुसार, स्पर्धेची विभागणी खालील तीन मुख्य टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे:
- १. सुपर सिरीज (सुरुवातीचा टप्पा): पात्र ठरलेल्या 14 संघांपैकी सर्वात कमी रँकिंग असलेले शेवटचे तीन संघ (12 व्या, 13 व्या आणि 14 व्या क्रमांकाचे) आधी एकमेकांविरुद्ध राउंड-रॉबिन पद्धतीने खेळतील. यातून केवळ एकच विजेता संघ पुढील मुख्य फेरीत प्रवेश करेल.
- २. मुख्य ग्रुप स्टेज: या टप्प्यात एकूण 12 संघ असतील, ज्यांची 6-6 च्या दोन गटात (ग्रुप) विभागणी केली जाईल. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 5 संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल.
- ३. सुपर ७ फेरी: दोन्ही गटांमधील अव्वल 3-3 संघ आणि दोन्ही गटांतून सर्वोत्तम कामगिरी करणारा चौथ्या क्रमांकाचा 1 संघ, असे एकूण 7 संघ या फेरीसाठी पात्र ठरतील. हे 7 संघ पुन्हा एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील.
या ‘सुपर 7’ फेरीच्या गुणतालिकेतील अव्वल 4 संघ थेट उपांत्य फेरीत \ पोहोचतील. सेमीफायनलमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल. यातील विजेते अंतिम सामन्यात (फायनल) आमनेसामने येतील.
जुना फॉर्म्युला रद्द; मागील विश्वचषकांपेक्षा पूर्णपणे वेगळी रचना
आयसीसीने २०२७ च्या विश्वचषकासाठी यापूर्वी मंजूर केलेला जुना फॉरमॅट आता पूर्णपणे रद्द केला आहे. जुन्या रचनेनुसार, 7-7 संघांचे दोन गट करून थेट ‘सुपर सिक्स’ फेरी खेळवण्याचे नियोजन होते.
हा नवा फॉरमॅट 2019 आणि 2023 मध्ये झालेल्या मागील दोन विश्वचषकांपेक्षा खूपच वेगळा आहे:
- यापूर्वीच्या दोन्ही विश्वचषकांमध्ये केवळ 10 संघ सहभागी झाले होते.
- तिथे सर्व 10 संघ एकमेकांविरुद्ध लीग सामन्यांमध्ये खेळले होते आणि अव्वल 4 संघ थेट सेमीफायनलमध्ये पोहोचले होते.
- मात्र, आता 14 संघ आल्यामुळे आणि नव्या फेऱ्यांमुळे सामन्यांची संख्या आणि चुरस मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ ठरला असून त्यांनी सर्वाधिक 6 वेळा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. आता या नव्या फॉरमॅटमध्ये कोणता संघ बाजी मारणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.











