Jackfruit Recipe : कोकणच्या निसर्गरम्य भूमीप्रमाणेच तिथली खाद्यसंस्कृतीही अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पारंपरिक पदार्थ घराघरांत पोहोचत असून, त्यात ‘कच्च्या फणसाची फूस’ या भाजीला विशेष पसंती मिळत आहे. कोकणात या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व असून, पावसाळ्याच्या तोंडावर मिळणाऱ्या कोवळ्या फणसाची चव काही न्यारीच असते. केवळ उकडलेला कच्चा फणस आणि त्यावर चवीपुरते मीठ घालून खाणे, हा देखील एक निखळ आनंद असतो; मात्र त्याची रीतसर केलेली भाजी ही जेवणाची लज्जत द्विगुणित करते.
पूर्वतयारी आणि फणस चिरण्याची पद्धत-
या भाजीसाठी सर्वप्रथम कोवळा फणस व्यवस्थित निवडून घ्यावा लागतो. फणस कापताना हाताला आणि विळीला थोडे तेल लावल्यास त्याचा चीक चिकटत नाही. फणसाचे बाहेरील काटेरी कवच आणि आतील कडक भाग (ज्याला कोकणात ‘पाचा’ म्हणतात) काढून टाकावा. यानंतर फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. जर फणसात गरे तयार झाले असतील, तर ते वेगळे काढून किंवा तुकड्यांसह वापरता येतात. हे स्वच्छ धुतलेले तुकडे कुकरमध्ये घेऊन, त्यात पुरेसे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून साधारणतः ४ शिट्ट्या करून (किंवा फणस मऊ होईपर्यंत) उकडून घ्यावेत.
भाजी तयार करण्याची सविस्तर कृती-
फणस व्यवस्थित उकडल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. हे तुकडे गरम असतानाच हाताने किंवा स्मॅशरने व्यवस्थित कुस्करून (Smash) घ्यावेत. या कुस्करलेल्या फणसात घरगुती लाल तिखट, हळद आणि आपल्या रोजच्या वापरातील गरम मसाला घालून ते मिश्रण एकजीव करून ठेवावे. दुसरीकडे, कढईत गरजेनुसार तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्यावी. या फोडणीत भरपूर ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगावर परतावा. कांदा मऊ झाला की, त्यात मसाल्यांनी युक्त असलेला कुस्करलेला फणस घालावा.
अंतिम सजावट आणि आस्वाद-
सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्यावर झाकण ठेवावे आणि वाफेवर पाच ते सात मिनिटे चांगली शिजू द्यावे. भाजीला छान वाफ आली की, त्यावर ओल्या नारळाचा चव (खोवलेले खोबरे) आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. ही गरमागरम ‘फूस’ भाजी, भाकरी किंवा डाळ-भातासोबत अत्यंत चविष्ट लागते. इन्स्टाग्रामवरील @mummas_kitchen20 या खात्यावर या पारंपरिक रेसिपीचे सादरीकरण करण्यात आले असून, कोकणच्या या अस्सल चवीने सध्या खाद्यप्रेमींना भुरळ घातली आहे.











