BCCI investigation into Romi Bhinder mobile use in IPL dugout : आयपीएल 2026 मध्ये सातत्याने विजय मिळवत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचे मॅनेजर रोमी भिंदर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले. याप्रकरणी आता बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACU) कडक पावले उचलली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
गुवाहाटी येथील सामन्यात राजस्थान रॉयल्स 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही घटना घडली. डगआउटमध्ये बसलेले मॅनेजर रोमी भिंदर मोबाईल वापरत होते आणि त्यांच्या शेजारी बसलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा देखील फोनकडे बघत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यावर आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनीही कडक कारवाईची मागणी केली होती.
— Cricket Iconic (@ankanghosh335) April 11, 2026
BCCI आणि आयपीएल अध्यक्षांची भूमिका
आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डगआउट आणि ड्रेसिंग रूमसारख्या ठराविक भागात मोबाईल वापरण्यावर कडक बंदी आहे. भिंदर यांना फोन वापरण्याची अधिकृत परवानगी होती की नाही, याची आता पडताळणी केली जात आहे. जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले असेल, तर मॅच रेफरी आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अहवालानुसार त्यांच्यावर बंदी किंवा दंडाची कारवाई होऊ शकते.
आयपीएलचे कडक नियम काय सांगतात?
आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांनुसार, ‘प्लेअर आणि मॅच ऑफिशिअल एरिया’ मध्ये संवादाच्या साधनांवर पूर्णपणे बंदी आहे.
- नियम 1: खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्टेडियमवर आल्यावर आपले मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच बंद करून सुरक्षा अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतात.
- नियम 2: टीम मॅनेजर केवळ ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरू शकतो, डगआउटमध्ये नाही.
- नियम 3: केवळ टीम अॅनॅलिस्टला विशिष्ट टेबलवर संगणक वापरण्याची मुभा असते.
राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना 13 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. त्यापूर्वी या वादाचा संघाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.










