Home / महाराष्ट्र / Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले पंचतत्त्वात विलीन ! सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले पंचतत्त्वात विलीन ! सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

Asha Bhosle : आठ दशकांपासून अधिक काळ आपल्या गायनाने जनसामान्यांचे अवघे जगणे सुरेल करणार्‍या स्वरस्वामिनी आशा भोसले आज अनंतात विलीन...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Asha Bhosle : आठ दशकांपासून अधिक काळ आपल्या गायनाने जनसामान्यांचे अवघे जगणे सुरेल करणार्‍या स्वरस्वामिनी आशा भोसले आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या चाहत्यांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. सुदेश भोसले, शान या गायकांनी गाणी गाऊन त्यांना निरोप दिला. शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा ‘अभी ना जाओ छोडकर’ अशी उदास, केविलवाणी भावना त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात दाटून आली.


सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या लोअर परळ येथील ‘कासा ग्रांडे’ इमारतीतील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांना तिरंग्यात गुंडाळून सलामी देण्यात आली. अंत्यदर्शनासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून नामवंतांची रीघ लागली. सर्व क्षेत्रातील मान्यवर दर्शनाला येत होते. आशा भोसले यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर राज ठाकरे बराच वेळ आशा भोसले यांच्या कुटुंबियांसोबत बसून होते. आशा यांच्या भगिनी मीना आणि उषा, पुत्र आनंद, त्यांची नात जनाई तिथे उपस्थित होते. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य आले होते. आशा यांच्या आठवणीने उद्धव व रश्मी या दोघांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अशीच अवस्था क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचीही झाली. त्यालाही अश्रू आवरता आले नाहीत. राज्यपाल जिष्णू देव शर्मा, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही दर्शन घेतले.

अभिनेता रितेश देशमुख, तब्बू, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, हरीहरन, राकेश रोशन, नीना गुप्ता, लेस्ली लुईस, विवेक ओबेरॉय, रणवीर सिंह, उदित नारायण आणि क्रिकेटपटू मोहंमद
सिराज यांनीही अंत्यदर्शन घेतले.दुपारी तीन वाजता फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून शिवाजी पार्क स्मशानभूमीकडे अंतिम प्रवास सुरू झाला.  त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ट्रकवर फुलांचा वर्षाव केला.   शिवाजी पार्क स्मशानभूमीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनित्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, शंभुराज देसाई, दादा भुसे, भारत गोगावले, संजय शिरसाट हे मंत्री, उबाठाचे खासदार अनिल देसाई, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. मंत्री आशिष शेलार यांनी आशाताई यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

या सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमीर खान, विकी कौशल, अन्नु मलिक यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बंदुकींतून फैरी झाडून  सलामी आणि मानवंदना दिली. गायक सुदेश भोसले,  शान, अनुप जलोटा यांनी जिंदगी एक सफर है सुहाना, उड जायेगा हंस अकेला, जीवलगा राहिले घर दूर माझे, ही गाणी गाऊन अनोखी श्रद्धांजली वाहिली. आशा यांचा मुलगा आनंद यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांच्या मनात आशा यांच्याच गाण्याचे शब्द गुंजत होते, फिरुनी नवी जन्मेन मी.

पुण्यात आता लता-आशा हॉस्पिटल
आशा भोसले यांच्या निधनानंतर पुण्यात मंगेशकर कुटुंबाकडून बांधल्या जात असलेल्या रुग्णालयाला आता लता-आशा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी आज त्याची माहिती दिली. ते म्हणाले की, लता दीदीने पुण्यात आमचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक हॉस्पिटल आधीच बांधले आहे. दीदीच्या निधनानंतर आम्ही असे ठरवले की, तिच्या नावानेही आणखी एक हॉस्पिटल पुण्यात बांधावे. यासाठी आम्ही पुण्यापासून काही अंतरावर मोठी जमीन खरेदी केली. या हॉस्पिटलचे नाव लता मंगेशकर हॉस्पिटल असे होते. त्याचा कोनशिला समारंभ 16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार होता. या कार्यक्रमाला आशाही येणार होती. परंतु दुर्दैवाने तिचे निधन झाले. त्यामुळे आम्ही आता ठरवले आहे की, आमच्या नव्या हॉस्पिटलचे नाव लता-आशा हॉस्पिटल असे ठेवावे. त्याचा कोनशिला कार्यक्रम ठरल्याप्रमाणे 16 एप्रिललाच होणार आहे. याच कार्यक्रमात आशाला श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल 40 एकरवर उभे राहिल. त्याचा पहिला टप्पा 1,000 खाटांचा असेल, तर काम पूर्ण होईल तेव्हा 3,000 बेड असतील. यात एक संगीत संग्रहालयही असेल, त्यात लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक पाहायला मिळेल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या