Aditya Thackeray : उबाठात मोठा संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे. येत्या 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे आदित्य ठाकरे यांचे पक्षातील स्थान अधिक मजबूत होणार असून, त्यांच्याकडे संघटनात्मक आणि निर्णयप्रक्रियेतील मोठे अधिकार येण्याची शक्यता आहे.
2003 साली पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा दावा उबाठातील काही नेत्यांकडून केला जात आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत औपचारिक प्रस्ताव मांडून मंजुरी दिली जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे हे पक्ष संघटना, निवडणूक नियोजन आणि विविध महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत आहेत या चर्चेवर प्रतिक्रिया देताना उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
दरम्यान, मुंबईतील सेस/पागडी इमारतीमध्ये राहणार्या भाडेकरूंची योग्य प्रकारे नोंद करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी यात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020-2021 मध्ये मुंबईतील उपकरप्राप्त (सेस) आणि पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी कलम 79 (अ) आणि 79 (ब) बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली होती.
या कायद्याला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली होती. तथापि, काही जागामालकांकडून याविरोधात कायदेशीर अडथळे निर्माण करण्यात येत आहे. मुंबईत सुमारे 13,500 हून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये लाखो भाडेकरू वास्तव्यास आहेत. यापैकी अनेक इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहे. न्यायप्रक्रिया सुरू असतानाही काही ठिकाणी भाडेकरूंना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. या कारवाईवर स्थगिती द्यावी तसेच अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरूंची योग्य नोंद करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे. या विषयाकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊन भाडेकरूंना न्याय मिळेल असा मार्ग काढावा जेणेकरून पुनर्विकास प्रक्रियेसचालना मिळेल.
मात्र आ. आदित्य ठाकरे यांनी या चर्चा फेटाळल्या. ते म्हणाले की, मला पक्षात काही पद दिले जाणार आहे, ह्या बातमीत काहीही तथ्य नाही. अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची नोंद घ्यावी.











