MI vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या रणसंग्रामात आज क्रिकेटप्रेमींना एका रोमांचक लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर घरच्या मैदानावर खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ बलाढ्य पंजाब किंग्सशी दोन हात करणार आहे. स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, तर दुसरीकडे विजयाचा अश्वमेध दौडवणारा पंजाबचा संघ आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.
पंजाबचा फॉर्म विरुद्ध मुंबईचा संघर्ष-
पंजाब किंग्सचा संघ यंदाच्या हंगामात अत्यंत उत्कृष्ट लयीत दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत त्यांनी दणदणीत विजय मिळवला असून, एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. ७ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या पंजाबला अद्याप कोणीही पराभूत करू शकलेले नाही. याउलट, मुंबई इंडियन्सची गाडी विजयाच्या रुळावरून घसरलेली दिसत आहे. सलग पराभवांमुळे दबावात असलेला हार्दिक पांड्याचा हा संघ आज विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असेल.
रोहित शर्माच्या दुखापतीकडे सर्वांचे लक्ष-
मुंबई इंडियन्ससाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्यांचा मुख्य फलंदाज रोहित शर्माची दुखापत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मांडीचे स्नायू दुखावले गेल्याने रोहितला मैदान सोडावे लागले होते. काल संध्याकाळी रोहितने वानखेडेवर हजेरी लावून हलका सराव केला. त्याने थ्रो-डाऊन स्पेशलिस्ट्स आणि नेट बॉलर्सचा सामना केला असला, तरी त्याने धावण्याचा (स्र्पिट्स) सराव टाळला. तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानंतरच घेतला जाईल. रोहितची अनुपस्थिती मुंबईसाठी मोठा धक्का ठरू शकते.
गोलंदाजीतील अपयश आणि बुमराहचा फॉर्म-
मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर टाकणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गोलंदाजांना न मिळणारे यश. विशेषतः ‘पॉवरप्ले’च्या सहा षटकांमध्ये मुंबईचे गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला चार सामन्यांत अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांच्यासारखे अनुभवी पर्याय उपलब्ध असूनही मुंबईला सुरुवातीच्या षटकांत गडी बाद करता येत नसल्याने प्रतिस्पर्धी संघांचे मनोबल वाढत आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि रणनीती-
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपल्या संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त नसल्यास दानिश मलेवारला संधी मिळू शकते. तसेच, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. पंजाबकडून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांची गोलंदाजी मुंबईच्या फलंदाजांची कठीण परीक्षा घेऊ शकते.
मुंबई इंडियन्सची संभाव्य Playing XI-
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा/दानिश मलेवार, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह.











