Financial Planning: आजच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी किंवा अगदी फर्निचर खरेदी करण्यासाठी ‘लो-कॉस्ट ईएमआय’ हा पर्याय अतिशय सोयीचा वाटतो. महिन्याला छोटा हप्ता भरून वस्तू घरी आणणे सोपे असले तरी, दीर्घकाळात हे तुमच्या आर्थिक नियोजनासाठी नुकसानकारक ठरू शकते. कमी हप्त्याच्या (Lower EMI) मोहजालात अडकण्यापूर्वी त्यामागचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
ईएमआयचे गणित काय सांगते?
जेव्हा तुम्ही कमी हप्ता निवडता, तेव्हा कर्जाचा कालावधी आपोआप वाढतो. कालावधी जितका जास्त, तितके जास्त व्याज तुम्हाला बँकेला द्यावे लागते. हे एका उदाहरणावरून समजून घेऊया:
समजा तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजाने घेतले आहे:
- पर्याय 1 (कमी मुदत – 5 वर्षे): तुमचा हप्ता सुमारे 21,247 रुपये असेल. ५ वर्षांनंतर तुम्ही एकूण 12.75 लाख रुपये भरलेले असतील. म्हणजेच व्याजापोटी 2.75 लाख रुपये जातील.
- पर्याय 2 (जास्त मुदत – 10 वर्षे): तुमचा हप्ता 13,215 रुपयांपर्यंत खाली येईल. मात्र, १० वर्षांनंतर तुम्ही एकूण 15.86 लाख रुपये भरलेले असतील. यात व्याजाची रक्कम 5.86 लाख रुपये असेल.
गृहकर्जाच्या बाबतीत धोका अधिक
गृहकर्ज हे साधारणपणे 15 ते 25 वर्षांच्या मोठ्या कालावधीसाठी असते. अशा वेळी ‘लो ईएमआय’चा पर्याय निवडणे खूप महाग पडते.
- उदाहरण: 50 लाख रुपयांचे गृहकर्ज (8.5% व्याज) जर तुम्ही 25 वर्षांसाठी घेतले, तर तुम्ही मुद्दलापेक्षा जास्त म्हणजेच तब्बल 70 लाख रुपये फक्त व्याजापोटी भरता. तेच कर्ज 15 वर्षांसाठी घेतले तर व्याजाची रक्कम 38 लाखांपर्यंत मर्यादित राहते.
असे का घडते?
१. मुद्दल संथ गतीने कमी होते: जेव्हा हप्ता लहान असतो, तेव्हा तुमच्या हप्त्यातील मोठा हिस्सा व्याजात जातो आणि मूळ रक्कम (Principal) लवकर कमी होत नाही.
२. व्याजाचा भुर्दंड: कर्ज जेवढे जास्त दिवस तुमच्याकडे राहील, तेवढ्या अधिक काळासाठी बँक त्यावर व्याज आकारत राहते.
दीर्घकालीन कर्ज कधी फायदेशीर ठरते?
कमी हप्त्याचा पर्याय फक्त तेव्हाच निवडावा जेव्हा तुमच्याकडे रोख रकमेची चणचण असेल. तसेच, हप्त्यातून वाचलेली रक्कम जर तुम्ही शेअर्स किंवा इतर चांगल्या ठिकाणी गुंतवून कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त परतावा मिळवणार असाल, तरच हा पर्याय योग्य ठरतो.
महत्त्वाची टीप: कर्जाच्या जाळ्यातून जितक्या लवकर बाहेर पडाल, तितके तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहील. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
हे देखील वाचा –











