PM Modi in Bengal: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राजकीय सभा आणि रॅलींच्या गडबडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक अनोखा आणि मनमोकळा अंदाज झाडग्राममध्ये पाहायला मिळाला.
प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोदींनी चक्क रस्त्याशेजारील एका छोट्या दुकानावर थांबून स्थानिक ‘झालमुडी’ (तिखट भेळ) खाण्याचा आनंद लुटला.
नेमका प्रकार काय?
झाडग्राममधील जाहीर सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा शहरातून जात होता. यावेळी अचानक त्यांनी आपला ताफा थांबवण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षारक्षक आणि नागरिक काही समजण्यापूर्वीच मोदी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या स्टॉलवर पोहोचले. त्यांनी दुकानदाराला प्रेमाने झालमुडी देण्याची विनंती केली, ज्यामुळे तो दुकानदारही अवाक झाला.
ঝাড়গ্রামে ঝালমুড়ি খাবার বিরতি! pic.twitter.com/t0TcDeONxt
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
‘कांदा खाणार का?’ आणि मोदींचे मिश्किल उत्तर
झालमुडी तयार करताना दुकानदार आणि पंतप्रधान यांच्यात झालेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुकानदाराने जेव्हा विचारले, “कांदा खाणार का?”, तेव्हा मोदींनी हसत उत्तर दिले, “हो, मी कांदा खातो, फक्त कुणाचे डोकं खात नाही.” त्यांच्या या मिश्किल उत्तरामुळे तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
दुकानदाराला दिले पैसे
झालमुडी खाल्ल्यानंतर मोदींनी आपल्या खिशातून 10 रुपये काढले आणि दुकानदाराला देऊ केले. दुकानदाराने पैसे घेण्यास सुरुवातीला नकार दिला, मात्र मोदींनी “असे नसते दादा, पैसे घ्यावेच लागतील,” असे म्हणत त्याला पैसे घेण्यास भाग पाडले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ स्वतः पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, “प्रचाराच्या चार सभांनंतर झाडग्रामच्या स्वादिष्ट झालमुडीची मजा घेतली,” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss Marathi 6 Winner: तन्वी कोलतेने मारली बाजी! ट्रॉफीसह जिंकली मोठी रक्कम; पाहा बक्षिसांची यादी











