Home / महाराष्ट्र / Jai Pawar : आईच्या निवडीदिवशीच जय पवार आमदार की साठी उतावीळ! 2029 ला विधानसभा लढणार!

Jai Pawar : आईच्या निवडीदिवशीच जय पवार आमदार की साठी उतावीळ! 2029 ला विधानसभा लढणार!

Jai Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात आज अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीचे मतदान सुरू असतानाच सुनेत्रा पवार...

By: Team Navakal
Jai Pawar
Social + WhatsApp CTA

Jai Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात आज अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीचे मतदान सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या अपेक्षित विजयावर न बोलता अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी उतावीळपणे आमदारकीची इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले की, 2029 मध्ये मी उमेदवार असावे, अशी लोकांची मागणी आहे. म्हणजे आई आमदार होत असतानाच त्यांची जागा खेचून जय पवार यांना आमदार व्हायचे आहे. त्यांच्या या धक्कादायक विधानाने इतकी खळबळ माजली की, जय पवार यांना पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करावी लागली, पण तीही पटण्यासारखी नव्हती. जय पवार यांनी 2029 सालची निवडणूक लढवणार असल्याचे सुस्पष्ट संकेत देताच रोहित पवार म्हणाले की, मग 2029 ची बारामती विधानसभा निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी होईल. जय पवारच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणूक लढवतील.


बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जय पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदान केंद्रावर आले होते. यावेळी त्यांना 2029 च्या निवडणुकीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जय म्हणाले की, 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची मागणी आहे. परंतु मला पक्षाचा लहान कार्यकर्ता म्हणून काम करायचे आणि सर्वांना मदत करायची आहे.   पुढे काय ते वेळ आल्यावर बघू. जय पवार यांच्या वक्तव्यानंतर 2029 मधील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचे थोरले पुत्र पार्थ पवार हे आता राज्यसभेचे खासदार आहेत. आई सुनेत्रा पवार यांच्या जागी निवड झाली आहे. सुनेत्रा पवार आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्या की त्या बारामती मतदारसंघाच्या आमदार होतील. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत जय पवार त्यांची जागा घेतील, तेव्हा सुनेत्रा पवार या कुठून लढणार? की त्या राजकीय संन्यास घेणार? ही चर्चा सुरू झाली आहे.


जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आ. रोहित पवार म्हणाले की, भविष्यात बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना अशी लढत नको आहे, पण काहीजण त्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या वेळी लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा सुप्रिया पवार विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली. त्यावेळी विधानसभा निवडणूक तरी पवार कुटुंबात होऊ नये, असे वाटत होते. परंतु विधानसभा निवडणूकही पवार विरुद्ध पवार अशी झाली. आता पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ नये, अशीच साहेबांचीही इच्छा आहे. जय पवार यांच्या वक्तव्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. 2029च्या निवडणुकीला वेळ आहे. तीन-साडेतीन वर्षे आहेत. त्यामुळे आता ही चर्चा करणे योग्य नाही. मात्र त्यानंतर आणखी एक गुगली टाकत युगेंद्र पवार म्हणाले की 2029 तोपर्यंत मतदार पुनर्रचना होऊ शकते.


मतदारसंघ वाढू शकतात. बारामतीचे दोन मतदारसंघ होऊ शकतात.  त्यांच्या या वक्तव्याने आणखी खळबळ उडाली. त्यांच्या विधानावरून लक्षात येते की बारामती मतदारसंघाचे दोन मतदारसंघ होणार आहेत, एका मतदारसंघातून सुनेत्रा पवार तर दुसर्‍या मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढणार हे पवार कुटुंबाचे ठरले आहे. यातूनच जय पवार यांनी आमदारकीची इच्छा व्यक्त केली. पवार कुटुंबाचे सत्तेसाठीचे राजकारण सतत सुरू असते. तर युगेंद्र पावर यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी म्हटले की, मी जय आणि रोहित दोघांचेही वक्तव्य ऐकलेले नाही. दोघेही तरुण आहेत, त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत. जयची निवडणूक लढवायची इच्छा आहे. दादा म्हणायचे की याच्यामध्ये पडू नको. पण लोकांचे बघून बघून त्याची इच्छा तयार झाली असेल.  त्याच्यात काही चूक नाही. तो दादांचा मुलगा आहे, बहुतेक 2029 मध्ये वहिनी माघार घेतील आणि जय निवडणूक लढवेल, असे दिसते आहे. जय यांच्या वक्तव्यांवरून चर्चा सुरू झाल्यावर  जयने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. माझी युगेंद्रशीही चर्चा झाली. आपण एकत्र राहिले पाहिजे, अशी त्याचीही इच्छा आहे. पवार विरुद्ध पवार लढत व्हावी, अशी कुणाचीही इच्छा नाही.

बारामती, राहुरीत मतदान
बारामती, राहुरीत आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. बारामतीत सुनेत्रा पवार यांना सर्व प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला असला तरी एकूण 22 उमेदवार रिंगणात होते.  राहुरीत भाजपाचे कर्डिले यांच्या विरोधात गोविंद मोकाटे, संतोष चाळके, रावसाहेब खेवरे आदि उमेदवार आहेत. राहुरी आणि बारामतीत मतदानाचा उत्साह नव्हता. बारामतीत 58 टक्के तर राहुरी 53 टक्के मतदान झाले. 4 मे रोजी निकाल आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या