Heat Alert : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, मुंबईकरांना आता रखरखत्या उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता वाढली असून, शहरात सध्या ‘उष्ण आणि दमट’ हवामानाची नोंद होत आहे. यामुळे केवळ उन्हाची तीव्रता जाणवत नसून, घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अस्वस्थतेत मोठी भर पडली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी चार दिवसांत कोकणासह राज्याच्या विविध भागांत तापमानाचा पारा आणखी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव ओसरला; गारवा हरवला-
मार्च महिन्याचा शेवट आणि एप्रिलच्या सुरुवातीला ‘पश्चिमी विक्षोभा’मुळे (Western Disturbance) मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर तापमानात काहीशी घट झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना पहाटेच्या वेळी मंद गारवा अनुभवायला मिळत होता. मात्र, आता पुन्हा एकदा पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण झाली असली, तरी त्याचा परिणाम मुंबईवर विपरीत होताना दिसत आहे. उन्हाची काहिली वाढल्याने पहाटेचा गारवा आता पूर्णपणे लुप्त झाला असून, दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीचा उकाडाही असह्य झाला आहे. गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात ३६ अंश, तर कुलाबा केंद्रात ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शुक्रवारी हा पारा ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम; रुग्णालयांत गर्दी-
या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. कडक ऊन आणि हवेतील ओलावा यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होत असून, सर्दी, ताप आणि तीव्र डोकेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. याशिवाय, डोळे कोरडे होणे (Dry Eyes) आणि पोटदुखी यांसारखे त्रासही उद्भवत आहेत. अति उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढला असून, सततच्या घामामुळे त्वचेच्या समस्या जसे की घामोळे, खाज सुटणे आणि फंगल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने (Dehydration) चक्कर येणे आणि थकवा जाणवण्याचे प्रमाणही वाढले आहे.
हवामान विभागाचा इशारा आणि सावधगिरीच्या सूचना-
समुद्र सानिध्यामुळे मुंबईच्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते, परिणामी उष्णतेची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवते. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी शहरात ‘उष्ण आणि दमट’ हवामान राहण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असली, तरी त्यामुळे उकाडा कमी होण्याऐवजी आर्द्रतेमुळे तो अधिक वाढू शकतो. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
पाण्याचे सेवन: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचे सेवन करावे.
पोशाख: उष्णतेपासून संरक्षणासाठी सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा.











