Home / देश-विदेश / AAP Rajya Sabha MP : खळबळजनक! भाजपमध्ये गेलेले ‘आप’चे खासदार अपात्र ठरणार? राज्यसभा सचिवालयाचे मोठे संकेत!

AAP Rajya Sabha MP : खळबळजनक! भाजपमध्ये गेलेले ‘आप’चे खासदार अपात्र ठरणार? राज्यसभा सचिवालयाचे मोठे संकेत!

AAP Rajya Sabha MP : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला (आप) राजकीय वर्तुळात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला...

By: Team Navakal
AAP Rajya Sabha MP
Social + WhatsApp CTA

AAP Rajya Sabha MP : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला (आप) राजकीय वर्तुळात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या राज्यसभेतील १० खासदारांपैकी ७ खासदारांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. २४ एप्रिल रोजी खासदार राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे आम आदमी पक्षाचा त्याग करत असल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी केवळ पक्षच सोडला नाही, तर राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या गटाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाल्याचेही जाहीर केले.

विलीनीकरणाची प्रक्रिया आणि तांत्रिक बाबी-
या बंडखोर गटात राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. या सातही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विलीकरणाशी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा), एखाद्या पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी दोन-तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. ‘आप’च्या १० पैकी ७ खासदारांनी हा निर्णय घेतल्याने ही अट पूर्ण झाली असून, यामुळे या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यसभा अध्यक्षांनी देखील या प्रक्रियेला मंजुरी दिली असल्याचे समजते.

‘आप’ची आक्रमक भूमिका आणि तक्रार-
दुसरीकडे, आम आदमी पक्षाने या कृतीला नियमांचे उल्लंघन आणि लोकशाहीची थट्टा असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, ते राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत. पक्षाचा दावा आहे की, जरी सात खासदारांची नावे चर्चेत असली तरी, केवळ तीन नेत्यांनीच अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे, तर उर्वरित चार सदस्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

संजय सिंह यांचा ‘ऑपरेशन लोटस’वर प्रहार-
या राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देताना ‘आप’चे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे ‘ऑपरेशन लोटस’ हे अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण आहे. पंजाबमधील भगवंत मान सरकारला अस्थिर करण्याचा आणि जनतेचा कौल अपमानित करण्याचा हा प्रयत्न आहे.” ज्या खासदारांना पंजाबच्या जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांनी जनतेशी गद्दारी केली आहे आणि पंजाबची जनता या ‘गद्दारांना’ कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या