Sanjay Nirupam : मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद आता रस्त्यावरील संघर्षापर्यंत पोहोचला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य केल्याच्या निर्णयाला शिवसेना नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर, २४ एप्रिल रोजी दहिसर येथे रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या निरुपम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तीव्र विरोधाचा सामना करावा लागला, ज्याचे रूपांतर नंतर हिंसक झटापटीत झाले.
संजय निरुपम हे रिक्षा चालकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांची मते जाणून घेण्यासाठी दहिसरमध्ये दाखल झाले होते. मात्र, निरुपम यांचे आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत मनसैनिकांनी निरुपम यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. हा तणाव इतका वाढला की, संतप्त कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या वाहनावर बाटल्या फेकल्या आणि त्यांच्या गाडीच्या चाकांमधील हवा सोडली. इतकेच नव्हे तर, कार्यक्रमाच्या सांगतेनंतर निरुपम तिथून निघत असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. “रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनावर आणि स्थानिक व्यापार्यांच्या दबावावर टीका करताना ते म्हणाले की, “काही लोकांच्या दबावाखाली येऊन पोलिसांकडून चुकीची कारवाई करण्यात आली. मुळात ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी होती.” मात्र, पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांविरुद्ध कारवाई केल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
निरुपम यांनी स्पष्ट केले की, पोलिसांच्या सूचनेचा मान राखून त्यांनी वादाचा प्रसंग टाळण्यासाठी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता, तरीही त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. “मी कोणाच्याही धमकावण्याला किंवा विरोधाला घाबरून थांबणारा माणूस नाही. रिक्षा चालकांच्या हितासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील आणि मी भविष्यातही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जात राहीन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.










