Mangalwedha News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत हद्दीत एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांसह मातेचा साठवण तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, खडकी गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली अनिल घोडके (वय ३५ वर्षे) या गुरुवारी सकाळी आपली कन्या श्रेया अनिल घोडके (वय १२ वर्षे) आणि मुलगा सोहम अनिल घोडके (वय १० वर्षे) यांच्यासह गावातील साठवण तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुण्याचे काम सुरू असताना, तलावाच्या काठावर खेळणाऱ्या मुलांचा अचानक पाय घसरला असावा किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले असावेत, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्या मुलांना बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी माऊलीने पाण्यात उडी घेतली, परंतु दुर्दैवाने एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही जण खोल पाण्याच्या विळख्यात अडकले आणि त्यांचा करुण अंत झाला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवेढा पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. प्रदीर्घ प्रयत्नांनंतर आई वैशाली घोडके यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र, श्रेया आणि सोहम या दोन्ही निष्पाप बालकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आई आणि दोन मुलांवर काळाने एकाच वेळी झडप घातल्याने घोडके कुटुंबाचा आधार पूर्णपणे कोलमडला आहे.










