Ahilyanagar Crime News : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील कथित ‘दत्तधाम’ आश्रमात सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या काळ्या कारभाराविरोधात पोलिसांनी आता कारवाईचा फास आवळला आहे. भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी २०० हून अधिक चित्रफिती (व्हिडिओ) जप्त केल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला आहे. या व्हिडिओंच्या माध्यमातून गडगे याने केलेल्या फसवणुकीचे आणि अघोरी कृत्यांचे पुरावे समोर येण्याची शक्यता असल्याने, हे सर्व साहित्य फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
औषधांचा साठा आणि संशयास्पद उपचार
राजेंद्र गडगे हा मंत्रशक्तीच्या जोरावर कॅन्सरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा आणि ‘पुत्रप्राप्ती’ करून देण्याचा खोटा दावा करून भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करत होता. पोलिसांनी आश्रमातून ९० हून अधिक प्रकारच्या संशयास्पद औषधांचा साठा हस्तगत केला आहे. ही औषधे नेमकी कशाची आहेत आणि त्यांचे रुग्णांच्या प्रकृतीवर काय परिणाम झाले, हे तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयानेही गडगेला नोटीस बजावली असून त्याच्या वैद्यकीय दाव्यांची पोलखोल केली आहे.
अफाट संपत्ती आणि आर्थिक व्यवहार
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान गडगे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर अहिल्यानगर, संगमनेर, नेवासा आणि राहाता या भागात तब्बल १३ स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांची कायदेशीर कागदपत्रे पडताळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, गडगेची १० विविध बँकांमधील खाती गोठवण्यात आली असून, त्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने किती माया जमवली, याचा लेखाजोखा आता पोलीस मांडत आहेत.
मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यात राजेंद्र गडगेसह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे पोलीस कोठडीत आहेत, तर औषधांचा पुरवठा करणारा मुख्य दुवा मानला जाणारा डॉ. मोहन पुरी हा फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. उर्वरित दोन आरोपींचाही शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
नागरिकांना आवाहन
सोशल मीडियावर ‘उपचाराने बरे झाल्याचे’ जे दावे केले जात होते, त्यांची सत्यता पोलीस पडताळत आहेत. ते लोक खरोखर रुग्ण होते की केवळ गडगेचे प्रचारक होते, याचा तपास आता केला जाणार आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांची किंवा महिलांची या भोंदूबाबाने फसवणूक केली आहे, त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी.










