Home / महाराष्ट्र / Bageshwar Baba : शिवाजी महाराज व रामदास स्वामी भेटीबद्दल बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Bageshwar Baba : शिवाजी महाराज व रामदास स्वामी भेटीबद्दल बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Bageshwar Baba : शिवाजी कोण होता, या पुस्तकावरून वाद सुरू असतानाच आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा...

By: Team Navakal
Bageshwar Baba
Social + WhatsApp CTA

Bageshwar Baba : शिवाजी कोण होता, या पुस्तकावरून वाद सुरू असतानाच आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, शिवरायांनी युद्धात थकल्यानंतर रामदास स्वामींना स्वराज्य सांभाळण्याची विनंती केली होती. या वक्तव्यानंतर शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबांवर टीका होत आहे.


नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारतदुर्गा मंदिराच्या शिलान्यासानंतर धर्मसभा आयोजित केली होती.  सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मंचावर उपस्थित होते. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अनेक युद्ध करून थकले. तेव्हा ते गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले. शिवरायांनी आपला जिरेटोप काढला व सांगितले की, मी अनेक लढाया लढलो, पण आता पुढे लढायचे नाही. हा जिरेटोप आणि स्वराज्य आता तुम्ही सांभाळा. तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो. मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आता आम्हाला आराम करायचा आहे. यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, ठीक आहे मी स्वीकार करतो. त्यांनी शिवरायांना तुम्ही आणि मी कोण आहोत, असा सवाल केला. त्यावर त्यांनी मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरू आहात असे शिवरायांनी सांगितले.

त्यावर समर्थांनी शिष्याचे कर्तव्य विचारले. शिवरायांनी गुरूचा आदेश पाळणे शिष्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यानंतर रामदास स्वामींनी जिरेटोप पुन्हा शिवरायांच्या डोक्यावर चढवत आजपासून माझ्या राज्याचे संचालन तुम्ही करायचे, अशी आज्ञा त्यांना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांच्या झोळीत आपले राज्य टाकले, अशी कथा पूर्वीपासून सांगितली जाते. परंतु रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि दोघांची कधी भेटही झाली नाही, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. बाबा बागेश्वर यांनी रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे म्हटल्याने त्यांना विरोध होत आहे.  


इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उत्तरेकडील या बाबा महाराजाच्या  डोक्यात शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास डोक्यात बसला आहे. शिवाजी महाराज हे लढून थकणारे नव्हते. तसे संदर्भदेखील नाहीत. या सर्व भाकडकथा आहेत, याला इतिहासात एक कणाचा देखील आधार किंवा पुरावा नाही. याविषयी काही बोगस कागदपत्रे लंडनमधून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी खुलासा केला होता की, सगळे खोटे आहे. बाबा बागेश्वर यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांचा निषेध केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,  कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते. मात्र अशा वक्तव्यावेळी कोणीही हस्तक्षेप का केला नाही? शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय येतो. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ’भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बागेश्वर बाबा यांनी जे सांगितले याचा दाखला इतिहासात नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. रामायण महाभारताबाबतही अशा कथा प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या पुस्तके किंवा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख नाही.

एक मूल संघाला द्या!
बाबा बागेश्वर यांनी या कार्यक्रमात आणखीही एक वादग्रस्त वक्तव्य केले.  ते म्हणाले की,  देशावर संकट आल्यावर संघाचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे येतात. आपण चार मुले जन्माला घातल्यास त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या. ही मुले समाजकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडतील.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या