Watermelon Family Death : दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया आणि आयशा व झैनब या त्यांच्या दोन मुली अशा चौघांचा या दुर्घटनेत अंत झाला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास डोकाडिया कुटुंबाने आपल्या इतर नातेवाईकांसोबत एकत्रितपणे बिर्याणीचे सेवन केले होते. त्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास कुटुंबाने कलिंगड खाल्ले. पहाटेच्या सुमारास या चौघांनाही तीव्र उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या चारही जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या जबाबात, बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतरच त्रास सुरू झाल्याचे नमूद केले होते.
पोलीस तपासातील महत्त्वाचे टप्पे-
या प्रकरणावर माहिती देताना परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, “जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात या घटनेची ‘अनैसर्गिक मृत्यू’ (ADR) म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कुटुंबाने खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे आणि विशेषतः कलिंगडाचे नमुने हस्तगत केले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी केली जाणार आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, हे शोधण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी विचार करत आहे.”
शविच्छेदन आणि ‘व्हिसेरा’ अहवालाची प्रतीक्षा-
मृतांचे शविच्छेदन (Post-Mortem) पूर्ण झाले असून, प्राथमिक तपासात विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा व्हावा यासाठी डॉक्टरांनी मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे नमुने म्हणजेच ‘व्हिसेरा’ राखून ठेवला आहे.
नेमकं प्रकरण काय?
आर्थिक राजधानीतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका सुखी कुटुंबाचा क्षणात अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संशयास्पद मृत्यूच्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू हा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जेवणानंतर अचानक बिघडली प्रकृती-
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री डोकाडिया कुटुंबाने घरी बिर्याणीचा बेत आखला होता. कुटुंबातील चारही सदस्यांनी आनंदाने एकत्र जेवण केले आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ले. मात्र, हे जेवण त्यांच्यासाठी काळ ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. कलिंगडाचे सेवन केल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. अवघ्या काही तासांत त्यांची प्रकृती इतकी खालावली की, उपचारांची संधी मिळण्यापूर्वीच ते घरात बेशुद्ध पडले.
वैद्यकीय प्रयत्न आणि दुर्दैवी मृत्यू-
कुटुंबाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच तातडीने स्थानिक डॉक्टर कुरेशी यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टर जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा चारही सदस्य गंभीर बेशुद्धावस्थेत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. एकामागून एक अशा चारही सदस्यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कारणाचा शोध: कलिंगड की अन्य काही?
या सामूहिक मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी ‘फूड पॉइझनिंग’ हेच प्रमुख कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कलिंगडामध्ये काही विषारी अंश होते की बिर्याणी आणि कलिंगड यांच्या एकत्रित सेवनामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन ही विषबाधा झाली, या दिशेने आता तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतदेहांचे विच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.











