Jyotiraditya Scindia : संपूर्ण भारत सध्या भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. नागरिक घामाघूम झाले असून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक विचित्र उपाय सुचवला आहे.आपल्या मतदारसंघातील एका सभेत बोलताना त्यांनी खिशात कांदा ठेवल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते, असे सांगितले.
गाडीत एसी नाही, खिशात फक्त कांदा!
ग्वाल्हेर-शिवपुरी येथील सभेत भाषण करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी नागरिकांना उन्हापासून सावध राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या खिशातून एक कांदा काढून सर्वांना दाखवला.
शिंदे म्हणाले, “मी माझ्या गाडीत एसी वापरत नाही, त्याऐवजी मी नेहमी खिशात एक कांदा ठेवतो. खिशात कांदा असेल तर ५१ डिग्री तापमानातही तुम्हाला काहीही होणार नाही.” त्यांच्या या विधानाला पाठिंबा देत सभेतील एका वृद्ध व्यक्तीनेही आपल्या खिशातील कांदा काढून दाखवला.
हवामान विभागाच्या (IMD) मार्गदर्शक सूचना
एकीकडे मंत्र्यांनी घरगुती उपाय सांगितला असला तरी, भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेबाबत अधिकृत नियमावली जाहीर केली आहे. हवामान विभागाने नागरिकांना खालील गोष्टी पाळण्याचे आवाहन केले आहे:
- दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- सुती आणि हलके कपडे परिधान करावेत.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
देशातील तापमानाची स्थिती
हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे देशातील सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आगामी काही दिवसांत उष्णतेचा हा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे देखील वाचा – Nitesh Rane Convicted: चिखलफेक प्रकरण नितेश राणे यांना भोवलं! न्यायालयाने सुनावली 1 महिन्याची शिक्षा; जाणून घ्या नेमकं प्रकरण










