Zeeshan Siddique : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला आलेल्या एका जागेसाठी अखेर झिशान सिद्दीकी यांच्या नावावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उमेदवारीसाठी प्रामुख्याने विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन आणि झिशान सिद्दीकी या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. मात्र, राजकीय समीकरणे आणि भविष्यातील रणनीती लक्षात घेता, पक्षाने सिद्दीकी यांच्या निवडीला प्राधान्य दिले आहे.
झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजय संपादन करून त्यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला होता; त्याकाळी ते राज्यातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. विधिमंडळातील कामगिरीसोबतच त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती.
राजकीय प्रवासात मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे समाजकंटकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना पुन्हा वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले होते. या चुरशीच्या लढतीत त्यांना ४६,३४३ मते मिळाली, परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणुकीतील या पराभवानंतरही पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि तरुण नेतृत्वाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याचे बोलले जात आहे.











