Home / महाराष्ट्र / Sarpanch of Massajog : मस्साजोग सरपंच निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव ! स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी

Sarpanch of Massajog : मस्साजोग सरपंच निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव ! स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी

Sarpanch of Massajog : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी काल मतदान पार पडले....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Sarpanch of Massajog : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी काल मतदान पार पडले. या निवडणुकीत मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. गावकर्‍यांच्या आग्रहाखातर आणि न्याय मिळावा यासाठी मी निवडणूक लढत आहे असे त्या म्हणाल्या होत्या. परंतु गावकर्‍यांनी त्यांना साथ दिली नाही आणि 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी विजयानंतर संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी निवडणुकीला उभ्या राहिल्या. गावातील काही ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तरी पण स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक अटळ ठरली. संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख हे जवळचे नातेवाईक आहेत. संतोष देशमुख हे स्वरूपानंद देशमुख यांच्या वडिलांचे भाचे आहेत. मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला होता.


आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर स्वरूपानंद देशमुख हे 156 मतांनी आघाडीवर होते. दुसर्‍या फेरीत त्यांची आघाडी 20 मतांवर आली. मात्र तिसर्‍या फेरीअंती स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत एकूण 83.69 टक्के विक्रमी मतदान झाले होते. 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वरूपानंद देशमुख यांना 914 मते मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना 822 मते मिळाली. नोटाला आठ मते पडली. या निवडणुकीत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांनी आपल्या आईसाठी प्रचार केला होता. त्यामुळे गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. अश्विनी देशमुख विजयी होतील, अशी चर्चा असतानाच मतमोजणीच्या सुरुवातीपासून स्वरूपानंद देशमुख आघाडीवर राहिले आणि अखेरीस त्यांनी विजय मिळवला.

विजयानंतर बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणुकीत पैशांचा वापर आणि राजकीय दबावतंत्राचा वापर झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले की ,  संतोष अण्णा किंवा अश्विनीताईंसोबत माझे कोणतेही वैयक्तिक भांडण नव्हते. संतोष देशमुख प्रकरणात आम्ही अश्विनीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि त्यांना न्यायालयीन लढाईत आमची पूर्ण साथ असेल. कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निकाल स्वीकारत विजयी उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, पहिल्या सहा महिन्यात जर निवडणूक झाली असती तर वेगळे चित्र दिसले असते. परंतु तब्बल 16 महिन्यांनी ही निवडणूक झाली.  या कालावधीत आम्ही सर्वजण न्यायालयीन लढाईत होतो. त्यामुळे गावकर्‍यांशी तेवढा संपर्क ठेवता आला नव्हता. त्यामुळे असा निकाल लागला असावा. परंतु आम्हाला हा पराभव मान्य आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या