Home / महाराष्ट्र / Ambadas Danve : उद्धव ठाकरेंनी आमदारकी सोडली! अंबादास दानवे उमेदवार ! भाजपा आता मैदानात! दानवेंना हरविण्याची तयारी

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंनी आमदारकी सोडली! अंबादास दानवे उमेदवार ! भाजपा आता मैदानात! दानवेंना हरविण्याची तयारी

Ambadas Danve : विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे मविआचे उमेदवार म्हणून निवडून येतील आणि पुन्हा आमदार होतील...

By: Team Navakal
Ambadas Danve
Social + WhatsApp CTA

 Ambadas Danve : विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे मविआचे उमेदवार म्हणून निवडून येतील आणि पुन्हा आमदार होतील अशीच चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी आमदारकी सोडली आहे. त्यांनी त्यांच्या जागेवर अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजे यापुढे उद्धव ठाकरे हे आमदार नसतील आणि अधिवेशनातही ते सहभागी होऊ शकणार नाहीत.


उबाठाने आम्हाला विश्वासात न घेता दानवेंचे नाव दिले म्हणून आम्हीही उमेदवार देऊ अशी कुरकुर काँग्रेस करीत असली तरी ते माघार घेतील हेच त्यांच्या आजवरच्या कृत्यावरून लक्षात येते. त्यामुळे दानवे यांना मविआची साथ मिळेल, पण उद्धव ठाकरे उमेदवार नाहीत तर आम्ही फोडफोडीचे राजकारण करून पाचवा उमेदवार निवडून आणू, असे संकेत भाजपाने लगेच दिले. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच चित्र स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे नुकतेच फडणवीस यांना भेटल्याची चर्चा होती. त्या भेटीतच सर्व ठरले असेल का?


महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एकमेव जागा उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे लढवतील, असे गेले काही दिवस सांगितले जात होते. मात्र, आज उबाठाकडून या जागेसाठी अनपेक्षितपणे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे मविआत खळबळ उडाली आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे यांना आधीच पाठिंबा जाहीर करणार्‍या काँग्रेसने अंबादास दानवे यांच्या नावाला विरोध करत या निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत उमेदवार उभा करायचा नसेल तर दोन वर्षांनी होणारी राज्यसभा आणि पुन्हा होणारी विधान परिषद निवडणुकीत आमचाच उमेदवार राहील, असे आश्वासन मिळावे हा काँग्रेसचा आग्रह आहे. भाजपाही अतिरिक्त उमेदवार उभा करू शकतो. तसे झाल्यास मविआच्या हातून ही जागा निसटू शकते. त्यामुळे उद्या अर्ज भरण्यापर्यंत काँग्रेस उमेदवारीबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आज जाहीर केले. दानवे उद्या 11 वाजता अर्ज भरणार आहेत. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संपुष्टात आला होता. 2019 मध्ये मविआची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री बनून विधान परिषद आमदार झालेले उद्धव ठाकरे यांचाही विधान परिषदेतील कार्यकाळ 2 मे रोजी संपत आहे. दरम्यान राज्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत आमदारांच्या संख्याबळानुसार मविआला केवळ एक जागा मिळणार आहे. या जागेवर मविआत सर्वाधिक 20 आमदार असलेल्या उबाठाने सुरुवातीपासूनच दावा सांगितला आहे. ही जागा उबाठाकडून उद्धव ठाकरे हेच  लढवतील, असेही गृहित धरले जात होते.  या जागेवर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, असे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही उद्धव ठाकरे यांच्या नावालाच पसंती दिली होती. या प्रकारे नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्या नावाला उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी समर्थन दिले होते. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरले होते. मात्र, उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होण्यास उत्सुक नसून ते दुसरे नाव जाहीर करतील अशीही चर्चा गेले काही दिवस सुरू झाली होती. तरीही उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी कायम ठेवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतः ऐवजी उबाठाचा आक्रमक चेहरा असलेले अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करून त्यांना धक्का दिला.


विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे, अशी आमची सगळ्यांची भूमिका होती. परंतु उद्धवजींनी एका सामान्य सैनिकाला त्यांची जागा सभागृहात दिली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून, मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असे वाटते. मी याआधीही सभागृहात होतो. आता एका गॅपनंतर पुन्हा सभागृहात येतो आहे. काँग्रेस माझ्या उमेदवारीला विरोध करील, असे वाटत नाही. उबाठाच्या या निर्णयावर शरद पवार गटाने आश्चर्य व्यक्त केले असले तरी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांची एकमताने निवड झाली होती. त्याच प्रमाणे विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देण्याचे ठरले होते. त्यावेळी दुसर्‍या नावाची चर्चा नव्हती. उद्धव ठाकरे हेच उमेदवार असावेत, हीच मागणी होती. मात्र शिवसेनेने आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आमच्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही. परंतु तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. उमेदवार कोणताही असो, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.


काँग्रेसने दानवे यांच्या नावाला जोरदार विरोध करत आपणही उमेदवार जाहीर करणार असे म्हटले आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिवसेना ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करताना त्यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवली असती तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता. आमचे तसे ठरलेही होते. पण आता दुसरेच नाव समोर आले. मी यासंबंधी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना तुमच्याशी या नावासंदर्भात चर्चा झाली काय? असे विचारले. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. ते सध्या दिल्लीत आहेत. ते दिल्लीहून मुंबईत परतल्यावर मी त्यांच्याशी पुन्हा चर्चा करीन. त्यानंतर पक्षाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तूर्त ठाकरे गटाने आमच्याशी या प्रकरणी कोणतीही चर्चा केली नाही. पुढील दोन वर्षांत राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक आहे. त्या संदर्भातही स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, विधान सभेची जागा शिवसेना लढवणार असेल, तर पुढची राज्यसभेची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे. आम्ही ही जागा सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवले असेल, तर काँग्रेस उमेदवार देईल.


नाराज काँग्रेसने आपला उमेदवार दिला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल. मात्र, काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर निवडणूक होईल. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा लागणार आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला 6 जागा येणार आहे. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार दिल्यास मविआतील फुटीचा फायदा उचलून भाजपा आपला सातवा उमेदवार देऊन तो निवडून आणण्याची करामतही करू शकेल.

झिशान सिद्दीकी उमेदवार
अजित पवार गटाची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या एका जागेसाठी झिशान सिद्दीकी यांचे नाव जाहीर केले आहे. विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावाची चर्चा होती. अखेरीस झिशान सिद्दीकी यांच्या नावाला पसंती देण्यात आली. झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि वांद्रे पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यावेळी ते महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार ठरले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्वेतील कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत उबाठाचे वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांना 46,343 मते मिळाली होती.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या