Bhor : भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 4 वर्षांच्या चिमुरडीची काल 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर मुलीचे नातलग आणि नसरापूरचे ग्रामस्थ आज आक्रमक झाले. दिवसभर ग्रामस्थांनी नसरापूर व परिसरात आंदोलन केल्यानंतर संध्याकाळी ते मुलीचा मृतदेह घेऊन पुण्याच्या नवले पुलावर आले. तिथे त्यांनी पुन्हा आंदोलन करून मुंबई-बंगळूरू मार्ग रोखून धरला. मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन आरोपीला फाशी देणार असल्याचे लिहून द्यावे, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली. यावेळी नवले पुलावर मोठा जनसमुदाय जमला होता. यामुळेमुंबई-बंगळूरू महामार्गावरील वाहतूक अनेक तास खोळंबून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून काही आंदोलकांची धरपकड केली व त्यांना पांगवले. त्यानंतर साडेतीन तासांनी महामार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू केली. मुलीचा मृतदेह ठेवण्यात आलेली रुग्णवाहिका महामार्गावरून रवाना करण्यात आली.
मुलीच्या वडिलांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आरोपीला फाशीची शिक्षा देऊ, असे मला लेटरहेडवर लिहून द्यावे किंवा आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे. आम्ही त्याचे काय ते करू. त्याशिवाय आम्ही मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही. मुख्यमंत्री मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी येऊ शकतात. तर आता इकडे का येऊ शकत नाहीत? आरोपीने यापूर्वी गुन्हा केला होता. मग तो लगेच सुटला कसा? त्यावेळी त्याला कठोर शिक्षा झाली असती, तर माझ्या मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडला नसता.
संतप्त नातलग आणि ग्रामस्थांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकायला तयार नव्हते. पुण्यातील भाजपाचे शहरप्रमुख धीरज घाटेही व इतर काही राजकीय नेतेही तिथे पोहोचले. परंतु नातलग आणि ग्रामस्थांनी आपली मागणी त्यांच्याकडेही कायम ठेवली होती. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणेही करून दिले. आरोपीला शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले. तरीही आंदोलक हटायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड करून महामार्ग मोकळा केला आणि वाहतूक पुन्हा सुरू केली.
दरम्यान, राजगड पोलिसांनी आरोपीला आज दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संबंधित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती. आरोपीने चिमुकलीला गाईचे वासरू दाखवतो असे सांगून जवळच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगार्याखाली लपवला. मुलगी घरी न दिसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीला आले. या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत रास्ता रोको केला. काल मृत चिमुरडीचा मृतदेहही पोलीस ठाण्याबाहेर ठेवला होता. तणावपूर्ण परिस्थिती पाहून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली.
पोलीस अधीक्षकांनी समजूत काढूनही आज नसरापूरमध्ये सकाळी पुन्हा आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या निषेधार्थ पुणे-सातारा मार्गावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर नसरापूरच्या सुपर मार्केटच्या चौकात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असताना बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी आरोपी आमच्या ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा करा, अशी मागणी केली. त्यावर पोलिसांनी तपास करू देण्याचे आव्हान केले. त्यानंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी संतप्त ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, पुण्याच्या पालकमंत्री व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधून या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, नसरापूर येथील घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड देण्याची मागणी सरकार न्यायालयात करणार आहे. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नसरापूरला भेट देऊन पीडित कुटुंब आणि ग्रामस्थांची भेट घेतली. आ. रोहित पवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन शक्ती कायद्याचा उल्लेख करत अशा घटनासंदर्भात कायद्यात तरतूद करण्याची बाब नमूद केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर लिहिले की, महाराष्ट्र दिनी अशी लाजिरवाणी घटना घडणे राज्याला शोभा देणारे नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवून या नराधमाला तत्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. याआधीही या नराधमाने चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची माहिती आहे. असे गुन्हेगार समाजात मोकाट फिरतात कसे? मविआ सरकारच्या कार्यकाळात मी गृहमंत्री असताना आम्ही मंजूर केलेला शक्ती कायदा केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या कायद्याची राज्यात नितांत गरज असताना केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे टोलवाटोलवी करून हा कायदा लागू करण्याऐवजी वेळ मारून नेत आहे. राज्यात सातत्याने महिलांवर-मुलींवर अत्याचार होत असतानाही शक्ती कायद्यासारखा कठोर कायदा लागू करण्याबाबत सरकार गंभीर नाही. आज राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात असता तर या नराधमाला 15 दिवसांत फाशीची शिक्षा
झाली असती.
आरोपीचा तिसरा गुन्हा
ग्रामस्थांनी माहिती दिली की, आरोपीने यापूर्वी लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन वेळा कारावास भोगला आहे. तो पाच ते सहा वर्षांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला आहे. या नराधमावर यापूर्वी एका 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय स्वतःच्या पुतणीवरही अत्याचार केल्याचा आरोप आला आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यात त्याला योग्य आणि कठोर शिक्षा झाली असती तर आज चिमुकलीवर हा प्रसंग ओढवला नसता.
चाकणमध्येही 3 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार
भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकलीचे प्रकरण ताजे असतानाच पुण्याच्याच खेड तालुक्यातील चाकणमध्ये 3 वर्षांच्या मुलाची अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या केली. त्याचा मृतदेह बंद खोलीत सुटकेसमध्ये लपवून ठेवला होता. या घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी मयत मुलाच्या आईने दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.











