Mittal–Poonawalla Buy Rajasthan Royals – लक्ष्मी निवास मित्तल, आदित्य मित्तल, विनिशा मित्तल आणि सिरम इन्सटिट्यूटचे अदर पूनावाला यांनी एकत्र येत राजस्थान रॉयल्स संघ सुमारे १.६५ अब्ज डॉलरला म्हणजे सुमारे १५,६६० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. नव्या करारानुसार मित्तल कुटुंबाकडे ७५ टक्के हिस्सा असेल, तर अदर पूनावालांकडे १८ टक्के हिस्सा असेल. उर्वरित ७ टक्के हिस्सा मनोज बडाले यांच्यासह विद्यमान गुंतवणूकदारांकडे कायम राहणार आहे.
स्टील उद्योगातील अब्जाधीश आणि आर्सेलरमित्तलचे संस्थापक लक्ष्मी या करारात राजस्थान रॉयल्सची आयपीएल पुरुष संघ फ्रँचायझी, दक्षिण आफ्रिकेतील पार्ल रॉयल्स आणि कॅरिबियनमधील बार्बाडोस रॉयल्स यांचाही समावेश आहे.
लक्ष्मी मित्तल यांनी सांगितले की, या गुंतवणुकीमागे वैयक्तिक भावनाही जोडलेल्या आहेत. मला क्रिकेट खूप आवडते आणि माझे कुटुंब राजस्थानमधील आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सपेक्षा दुसऱ्या कोणत्याही आयपीएल संघाचा भाग होण्याची माझी इच्छा नव्हती .अनेक महान खेळाडूंनी राजस्थान रॉयल्सची जर्सी परिधान केली आहे. या महान संघाचा भाग होण्यास मी उत्सुक आहे.
राजस्थान रॉयल्स ही आयपीएलच्या मूळ संघांपैकी एक असून, त्यांनी 2008 मध्ये पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळत असतानाही नवोदित प्रतिभा शोधणे आणि विकसित करण्यासाठी या फ्रँचायझीची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
नवीन मालकांना केवळ क्रिकेट संघ नव्हे, तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि कॅरिबियनमध्ये पसरलेल्या बहुराष्ट्रीय क्रीडा ब्रँडची जबाबदारी मिळणार आहे. लक्ष्मी मित्तल, आदित्य मित्तल, वनिशा मित्तल-भाटिया, अदार पूनावाला आणि मनोज बडाले हे राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळात सहभागी होणार आहेत. आदित्य मित्तल हे लक्ष्मी मित्तल यांचे पुत्र असून, वनिशा मित्तल-भाटिया या त्यांच्या कन्या आहेत.
उत्तर राजस्थानमधील सादुलपूर गावात जन्मलेल्या लक्ष्मी निवास मित्तल यांच्यासाठी हा करार वैयक्तिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. ते म्हणाले, “मला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि माझे कुटुंब राजस्थानचे असल्यामुळे राजस्थान रॉयल्स या संघाचा भाग होणे माझ्यासाठी विशेष आहे. शालेय जीवनात मी पहिल्यांदा क्रिकेट खेळलो आणि तेव्हापासून या खेळाशी माझा घट्ट संबंध आहे. अनेक महान खेळाडूंनी या संघासाठी खेळत तरुणांना प्रेरणा दिली आहे. या संघाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद असून, भविष्यातील यशासाठी चाहत्यांसोबत मैदानावर उपस्थित राहण्याची मला उत्सुकता आहे.”
आदित्य मित्तल यांनी सांगितले, “आयपीएल अल्पावधीतच जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे आणि राजस्थान रॉयल्स हा तिच्या प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. या संघाचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. नव्या प्रतिभेला वाव देणे ही या संघाची ओळख आहे आणि हा वारसा पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि विशेषतः चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत.”
मंडळात सहभागी होणाऱ्या वनिषा मित्तल-भाटिया म्हणाल्या, “लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड घरातूनच मिळाली. आमच्या कुटुंबाला खेळ आणि देश दोन्हीबद्दल प्रेम आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स सोबत या मोठ्या क्रीडा मंचावर काम करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे.”
तर अदार पूनावाला यांनीही या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले, “या गुंतवणुकीसाठी आदित्य मित्तल यांच्यासोबत काम करताना मला आनंद होत आहे. राजस्थान रॉयल्स हा मजबूत परंपरा असलेला संघ आहे आणि त्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी व दीर्घकालीन यशासाठी मी पाठिंबा देण्यास उत्सुक आहे.”











