Home / महाराष्ट्र / Women should not ignore uterine fibroids! – Adviced Dr. Rashmi : महिलांनी गर्भाशयातील गाठींकडे दुर्लक्ष करू नये! डॉ. रश्मी यांचा सल्ला

Women should not ignore uterine fibroids! – Adviced Dr. Rashmi : महिलांनी गर्भाशयातील गाठींकडे दुर्लक्ष करू नये! डॉ. रश्मी यांचा सल्ला

Women should not ignore uterine fibroids – गर्भाशयात गाठ आहे (फायब्रॉइड्स) हे ऐकताना अनेक महिलांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र...

By: Team Navakal
Women should not ignore uterine fibroids
Social + WhatsApp CTA

Women should not ignore uterine fibroids – गर्भाशयात गाठ आहे (फायब्रॉइड्स) हे ऐकताना अनेक महिलांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र अशी गाठ कर्करोगजन्य नसून महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य त्रास आहे. अनेक वेळा याची लक्षणे जाणवत नाहीत, तर काही वेळा पाळीतील अनियमितता, जास्त रक्तस्राव किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या दिसून येतात. अशा वेळी घाबरून न जाता योग्य वेळी निदान आणि उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. फायब्रॉइड्स नेमके काय असतात, त्यांची लक्षणे आणि उपचारपद्धती याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी फडणवीस यांनी ‘नवाकाळ’च्या वेदिका मांगेला यांना सविस्तर माहिती दिली.

महिलांच्यात गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे नेमके कारण काय आहे?

डॉ. रश्मी फडणवीस- गर्भाशयातील फायब्रॉइड (गाठी) कोणालाही कधीही होऊ शकतात. त्यामुळे त्या तयार होत असताना आपल्याला त्याची जाणीव होत नाही. हे फायब्रॉइड्स नेमके का होतात, हे पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. आहारात प्रोटीन कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त असल्यास पेशींची वाढ होऊ शकते. तरीही हे नेमके कधी आणि कोणाला होतील, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

त्याची लक्षणे कोणती दिसतात?

डॉ. रश्मी फडणवीस- सर्व फायब्रॉइड्सची लक्षणे दिसतात असे नाही. फायब्रॉइड्स मूत्राशयावर दाब देत असतील, तर वारंवार लघवी लागणे किंवा मूत्राशयाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फायब्रॉइडचा आकार आणि त्यातून होणारा त्रास यावरच उपचार ठरवले जातात. लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास- मूत्रदाह होणे, वारंवार लघवी लागणे, मूत्रनलिकेवर दाब आल्यामुळे संसर्ग वाढणे, पोटदुखी जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. आकारानुसार वेदना कमी-जास्त असू शकतात. जर फायब्रॉइड्स गर्भाशयाच्या आतील आवरणावर परिणाम करत असतील, तर त्या आवरणाची जाडी वाढून जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

रक्तस्त्राव खूप जास्त (नेहमीपेक्षा अधिक) होतो आणि तो अनेकदा गोळ्या घेतल्यावरच थांबतो. जर या गाठी गर्भाशयाच्या स्नायूंच्या थरात वाढल्या, तर त्यांना इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हणतात. अशा वेळी गर्भाशयाचा आकार नेहमीच्या आकारापेक्षा मोठा होतो. या गाठीमुळे पोटदुखी जाणवत राहू शकते. याशिवाय विशेष त्रास जाणवत नाही. जर गाठी गर्भाशयाच्या बाहेरील आवरणावर असतील, तर त्यांना सबसीरोसल फायब्रॉइड म्हणतात. अशा गाठींमुळे सुरुवातीला विशेष त्रास होत नाही. त्या वाढत राहतात आणि खूप मोठ्या झाल्यावरच त्रास जाणवू शकतो. जर गर्भाशयातील गाठींचा आकार तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

या गाठी काढणे अनिवार्य आहे की त्या औषधांनी बऱ्या होऊ शकतात?

डॉ. रश्मी फडणवीस- सध्या वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधनामुळे असे उपचार उपलब्ध झाले आहेत की, गर्भाशयातील गाठींना होणारा रक्तपुरवठा कमी केला तर त्यांचा आकार कमी होऊ शकतो. कारण रक्तपुरवठा कमी झाला तर पेशींची वाढही कमी होते. त्यानुसार काही नवीन औषधे उपलब्ध आहेत, ज्यामुळे गाठींचा आकार कमी करता येतो. मात्र, या औषधांनी गाठी पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. त्या तशाच राहतात, फक्त त्यांच्या आकारात आणि प्रमाणात कमी-जास्त फरक पडतो. जर गाठींचा आकार सुमारे ३ ते ४ सेंटीमीटर असेल आणि त्यातून त्रास होत असेल, तर ऑपरेशन करून त्या काढाव्या लागतात. पण जर कोणताही त्रास नसेल, तर विशेष काळजी करण्याची गरज नसते. साधारणतः ४० वर्षांपर्यंत ऑपरेशन करण्याचा विचार केला जातो, विशेषतः त्रास होत असल्यास. मात्र, वय जास्त (उदा. ७०–८० वर्षे) असताना सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड आढळले आणि त्रास नसेल, तर काळजी करण्याचे कारण नसते. फायब्रॉइड्समध्ये कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी म्हणजे सुमारे १% इतकीच असते. त्याला सार्कोमा असे म्हणतात. तुलनेने, ओव्हरीमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त (सुमारे ६०–७५%) असते. त्यामुळे फायब्रॉइड्सबाबत कॅन्सरचा धोका कमी मानला जातो.

आजकाल सोनोग्राफीमुळे या गाठींचे लवकर निदान होऊ शकते, त्यामुळे उपचार वेळेत करता येतात. प्रसूतीच्या वेळी जर नॉर्मल डिलिव्हरी झाली, तर या गाठी लक्षात येत नाहीत. पण सी-सेक्शन करताना त्या आपोआप दिसून येतात. मात्र, त्या वेळी त्या काढल्या जात नाहीत, कारण खूप रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा गाठी साधारण १ ते २ महिन्यांनंतर काढल्या जातात. जर या गाठींमुळे गर्भधारणेत अडथळा येत असेल, तर त्या लवकर काढणे आवश्यक असते. पण जर कोणताही त्रास नसेल, तर विशेष काळजी करण्याची गरज नसते. तरीही वेळोवेळी सोनोग्राफी करून त्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. या गाठींमध्ये वेळोवेळी काही बदल होऊ शकतात. कधी त्यात पाण्यासारखा द्रव तयार होतो, तर कधी रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे काही भाग नष्ट होतो. काही वेळा वेदनादायक बदलही होऊ शकतात. हे सर्व बदल ओळखण्यासाठी नियमित तपासणी गरजेची असते. गाठी काढायच्या की नाही, हे पूर्णपणे लक्षणांवर अवलंबून असते. जर खूप त्रास होत असेल, गर्भधारणेत अडथळा येत असेल किंवा मेनोपॉजनंतरही त्रास होत असेल, तर त्या काढणे आवश्यक असते. पण गाठी लहान असतील आणि कोणताही त्रास देत नसतील, तर त्या काढण्याची गरज नसते.

ऑपरेशननंतर या गाठी पुन्हा होतात का?

डॉ. रश्मी फडणवीस- ऑपरेशननंतर गाठी पुन्हा होतीलच असे नाही. पण काही वेळा असे होते की, ऑपरेशन करताना गाठी त्यांच्या कॅप्सूलपासून काढल्या जातात. जर त्यातील अगदी सूक्ष्म भाग (बीज) राहिला, तर त्यापासून पुन्हा गाठी विकसित होऊ शकतात. त्यामुळे त्या पुन्हा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मात्र, हा धोका तुलनेने कमी असतो.

या गाठींमुळे मासिक पाळीत त्रास होतो का?

डॉ. रश्मी फडणवीस- हो, फायब्रॉइड्समुळे पिरियड्समध्ये विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. जर गाठ अशा ठिकाणी असेल की जिथे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो, तर पोटात तीव्र वेदना जाणवू शकते. जर फायब्रॉइड सबम्यूकोसल प्रकारचा असेल, म्हणजे गर्भाशयाच्या आतील आवरणाशी संबंधित असेल, तर त्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी अचानक जास्त ब्लीडिंग झाल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो आणि तपासणीत फायब्रॉइड असल्याचे लक्षात येते. काही वेळा फायब्रॉइड पेडंक्युलेटेड प्रकारचा असतो, म्हणजे तो देठासारख्या भागावर वाढत जातो. हा गर्भाशयाच्या बाहेर किंवा आत दोन्ही बाजूंनी वाढू शकतो. अशा परिस्थितीत काही वेळा संभोगानंतरही रक्तस्त्राव होऊ शकतो. फायब्रॉइडची जागा देखील त्रासावर परिणाम करते. जर तो गर्भाशयाच्या पुढील भागात असेल, तर मूत्राशयावर दाब येऊन लघवीचा त्रास होऊ शकतो. आणि जर तो मागील भागात असेल, तर रेक्टमवर दाब येऊन बद्धकोष्ठता होऊ शकते. मासिक पाळीच्या काळात हे त्रास अधिक जाणवू शकतात. काही वेळा चांगला रक्तपुरवठा असल्यास फायब्रॉइड्सचा आकारही वाढू शकतो, आणि त्यामुळे पोटदुखी अधिक तीव्र होऊ शकते.

मग यासाठी आपण कोणते खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजेत?

डॉ. रश्मी फडणवीस- यासाठी सर्वप्रथम साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. मांसाहार, मैद्याचे पदार्थ आणि साखर यांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. हे पदार्थ टाळल्याने गाठींचा आकार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, आधीपासून असलेल्या गाठी पूर्णपणे नाहीशा होत नाहीत; त्यांच्या आकारात कमी-जास्त फरक पडतो. जीवनशैलीत बदल करणेही महत्त्वाचे आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शरीरातील संतुलन सुधारते आणि गाठींची वाढ नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

गाठींमुळे वजन वाढते किंवा शरीरात इतर बदल होतात का?

डॉ. रश्मी फडणवीस- साधारणपणे गाठींमुळे थेट वजन वाढणे किंवा कमी होणे असे स्पष्ट बदल दिसत नाहीत. मात्र, गाठींचा आकार वाढल्यास पोटदुखी, अपचन किंवा पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया हा एक पर्याय असला, तरी लगेच ऑपरेशन करणे आवश्यक नसते. आहारात बदल करणे, दररोज सुमारे ३ लिटर पाणी पिणे, नियमित व संतुलित आहार घेणे, प्रथिनांचे प्रमाण वाढवणे आणि तेलकट पदार्थ कमी करणे या गोष्टींमुळेही सुधारणा होऊ शकते.

गाठी म्हणजे पेशींची वाढ होऊन तयार झालेली संरचना. त्यामध्ये वेळोवेळी विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ, पुटीजन्य बदल (cystic degeneration) मध्ये गाठीमध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो. रक्तजन्य बदल (red degeneration) मध्ये रक्तपुरवठ्याशी संबंधित बदल होतात. तसेच काही वेळा इतर द्रवरूप बदलही गाठींमध्ये दिसतात. हे सर्व बदल पेशींमध्ये होणाऱ्या प्रक्रियांमुळे घडतात.

थायरॉईडमुळे असा त्रास होऊ शकतो का?

डॉ. रश्मी फडणवीस- थायरॉईडचा परिणाम मुख्यतः मासिक पाळीच्या चक्रावर होतो. मात्र, थायरॉईडमुळे गाठी होतातच असे नाही. हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास गाठी निर्माण होऊ शकतात. गाठी या स्तनांमध्ये होणाऱ्या गाठींसारख्याच असतात, म्हणजे शरीरात कुठेही पेशींची अनियमित वाढ झाली तर गाठ तयार होऊ शकते. गर्भाशयात या गाठी वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतात—स्नायूंमध्ये, आतील आवरणावर, बाहेरील आवरणावर किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळ. अशा प्रकारे त्यांचे विविध प्रकार आढळतात.


Web Title:
संबंधित बातम्या