SBI Nationwide Strike May 2026 : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ आणि २६ मे २०२६ रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाचे (SBI Strike) आवाहन केले आहे. या काळात बँकेचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
SBI Nationwide Strike May 2026 : संपाचे मुख्य कारण काय?
‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ (AISBISF) ने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे होत असलेले दुर्लक्ष आणि करारांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत हा संपाचा निर्णय घेतला आहे. २ मे २०२६ रोजी एसबीआय अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसमध्ये फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, औद्योगिक विवाद कायदा १९४७ अंतर्गत कर्मचारी या आंदोलनात सहभागी होतील. जर या दोन दिवसांपैकी एखादा दिवस सुट्टीचा असेल, तर हा संप २७ मे रोजी देखील सुरू राहील.
SBI Nationwide Strike May 2026 : कर्मचाऱ्यांच्या १६ प्रमुख मागण्या
फेडरेशनने एकूण १६ मागण्या मांडल्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे:
- भरती प्रक्रिया: संदेशवाहक आणि सशस्त्र रक्षकांची तातडीने भरती करणे.
- आउटसोर्सिंगला विरोध: कायमस्वरूपी कामांच्या आउटसोर्सिंगवर बंदी घालणे आणि कंत्राटी पद्धत थांबवणे.
- पुरेशी कर्मचारी संख्या: बँकांच्या शाखांमध्ये कामाचा ताण कमी करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे.
- पेंशन आणि बदली: राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील (NPS) त्रुटी दूर करणे आणि २०१९ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंतर-सर्कल बदल्यांचा प्रश्न मार्गी लावणे.
SBI Nationwide Strike May 2026 : “कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत”
फेडरेशनने आपल्या पत्रात खंत व्यक्त केली आहे की, गेल्या अनेक दशकांच्या संघर्षानंतर मिळवलेले कामगारांचे हक्क आता पद्धतशीरपणे मोडीत काढले जात आहेत. कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या जागी अनिश्चित रोजगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या संपामुळे बँकेच्या शाखांमधील व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ग्राहकांनी आपली महत्त्वाची बँकेची कामे आधीच नियोजित करणे फायदेशीर ठरेल.
हे देखील वाचा –
West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा










